लोकमत न्यूज नेटवर्कअहमदनगर : राज्यातील महाविकास आघाडी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीतही एकत्र दिसणार आहे़ राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजश्री घुले या अध्यक्ष, तर काँग्रेसचे प्रताप शेळके उपाध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केले आहेत. भाजप या निवडणुकीत अर्ज दाखल करण्याची शक्यता कमी असल्याने घुले-शेळके यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे.
अहमदनगर जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगरमध्ये महाविकास आघाडीची संयुक्त बैठक झाली. यावेळी आमदार रोहित पवार, आशुतोष काळे, पक्ष निरीक्षक अंकुश काकडे, माजी आमदार नरेंद्र घुले, शिवसेनेचे संपर्क प्रमुख भाऊ कोरगावकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, माजी आमदार चंद्रशेखर घुले, सत्यजित तांबे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे उपस्थित होते. या बैठकीत जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजश्री घुले आणि उपाध्यक्ष पदासाठी काँग्रेसचे प्रताप शेळके यांचे नाव निश्चित करण्यात आले. त्यानंतर घुले, शेळके यांनी पिठासन अधिकारी उर्मिला पाटील, वैशाली आव्हाड, वासुदेव सोळंके यांच्याकडे अर्ज दाखल केला. माजी पालकमंत्री राम शिंदे यांच्या कार्यालयात माजी पालकमंत्री राम शिंदे, राधाकृष्ण विखे, शालिनी विखे, शिवाजीराव कर्डिले, मोनिका राजळे यांची बैठक झाली. या बैठकीत जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी उमेदवारी ठरविण्यावर चर्चा झाली. यातजिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपकडून सुनीता खेडकर तर उपाध्यक्षपदासाठी संध्या आठरे यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली. 12 वाजून 45 मिनिटांनी भाजपकडून खेडकर व आठरे यांचा अर्ज दाखल करण्यात आला.