आरोपींमध्ये रेहान आयुब शाह (वय २९, बाबरपुरा चौक) व इप्तेकार उर्फ इत्तू इस्माईल शेख (रा. वाॅर्ड दोन) यांचा समावेश आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल खटके यांच्या पथकाने ही कारवाई केली. आरोपी रेहान शाह याने पोलीस ठाण्यात १५ ऑगस्टला दहा टायर ट्रक चोरीची फिर्याद नोंदवली होती. सहा लाख रुपये किमतीची ही ट्रक शहरातील सूतगिरणी परिसरातील अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचे शहा यांनी फिर्यादीत म्हटले होते.
शहरातून यापूर्वीही काही ट्रक चोरीचे गुन्हे घडलेले होते. त्यामुळे गुन्हे शाखेने स्वतंत्र पथक नियुक्त करत त्यांचा तपास सुरू केला होता. त्यामुळे या घटनेच्या तपासात फिर्यादीची चौकशी करण्यात आली. त्यात शाह याने अन्य साथीदारांसमवेत विमा कंपनीकडून विम्याचे पैसे लाटण्यासाठी खोटी फिर्याद दिल्याचे उघडकीस आले. शाह याने साथीदार इत्तू शेख व पप्पू गोरे यांच्यासह ट्रक चोरीला गेल्याचा बनाव केला अशी माहिती मिळाली.
पोलिसांनी त्यावरून आरोपींचा शोध घेतला. इत्तू यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून गुन्ह्यातील ट्रक हस्तगत करण्यात आला. आरोपी पप्पू उर्फ प्रशांत दादासाहेब गोरे (रा.वाॅर्ड दोन) याचा पोलीस शोध घेत आहेत. पथकामध्ये सहायक पोलीस निरीक्षक गणेश इंगळे, मनोहर गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, शंकर चौधरी, रवी सोनटक्के, रवींद्र घुंगासे, सागर ससाणे, रोहित येमूल, उमाकांत गावडे यांचा समावेश होता.