अहमदनगर: गणेशोत्सव आणि मोहरमनिमित्त पोलिसांनी दाखल केलेल्या प्रस्तावांवर शुक्रवारी उपजिल्हाधिकारी महेश पाटील यांनी सुनावणी घेत ३२१ जणांना उत्सवकाळात शहरबंदी केली आहे तर ३८४ जणांकडून चांगल्या वागणुकीचे हमीपत्र घेण्यात आले आहेत़ धार्मिक उत्सवात कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांनी सहाशेपेक्षा जास्त जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे प्रस्ताव तयार केले आहेत़ हे प्रस्ताव प्रांताधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आले होते़ प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर या सुटीवर असल्याने पोलिसांकडून आलेल्या प्रस्तावांवर पाटील यांनी सुनावणी घेतली़ गणेशोत्सव आणि मोहरमच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मागील वर्षीही सहाशेपेक्षा जास्त उपद्रवींवर प्रतिबंधात्मक कारवाई केली होती त्यानंतर लोकसभा निवडणुकीतही मोठ्या प्रमाणात अशा स्वरुपाची कारवाई करण्यात आली होती़ लोकसभा निवडणुकीत बहुतांशी जणांवर सहा महिने ते एक वर्षांसाठी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती़ त्यांचा कारवाईचा कार्यकाळ अजून संपलेला नाही़ त्यामुळे यावेळी प्रतिबंधात्मक कारवाईच्या प्रस्तावाचे प्रमाण मागील वर्षीच्या तुलनेत कमी होते़विविध स्वरुपाचे गुन्हे दाखल असलेल्यांवर ही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे़ ज्यांना उत्सवकाळात शहरातून हद्दपार करण्यात आले आहे त्यांच्यावर पोलिसांची नजर राहणार आहे़ हद्दपार करण्यात आलेल्यांमध्ये काही राजकीय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचाही समावेश आहे़
नगरमध्ये ३२१ उपद्रवी शहराबाहेर प्रतिबंधात्मक कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2019 4:00 PM