शिवाजी पवार
श्रीरामपूर : पूर्वी गूळ हे गरिबीचे तर साखर श्रीमंतीचे लक्षण मानले जात होते. मात्र गुळातील नैसर्गिक गुणधर्मांचे आरोग्याच्या दृष्टीने असलेले महत्त्व लोकांच्या लक्षात आले. त्यामुळे साखरेपेक्षा गूळ दुपटीने भाव खातो आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर साखर उद्योगाने मोठी भरारी घेतली. त्या तुलनेत गूळ तयार करण्याच्या प्रक्रियेत तंत्रज्ञान विकसित झाले नाही. आता मात्र या उद्योगाने कात टाकली आहे. गूळ निर्मितीसाठी दर्जेदार उसाची उपलब्धता, विशिष्ट तापमान ठेवणे, तसेच उत्पादनात यांत्रिकीकरणाचा आधार या बाबी समाविष्ट झाल्या आहेत. त्यातच गुळाची मागणी वाढल्याने गुऱ्हाळ उद्योगांमध्ये सतत संशोधन सुरू झाले आहे.
विशेषत: कोरोना संकटामुळे दररोजच्या आहारातील गुळाचा वापर वाढला आहे. लोक जाणीपूर्वक गूळ व गुळाचे पदार्थ खात आहेत.
---------
गूळ खाण्याचे फायदे :
रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण वाढविण्यास उपयुक्त.
गुळात मुबलक पोटॅशियम असल्याने रक्तदाब नियंत्रित राहतो.
नियमित पोट साफ होऊन बद्धकोष्ठता दूर होते.
यकृतातील अपायकारक घटक नष्ट होतात.
दमा, खोकला यासारखे कफाचे आजार कमी होतात.
-----------
साखर व गुळाचे दर प्रति किलो
वर्ष - साखर - गूळ
२००० : १० : १०
२००५ : १३ : १२
२०१० : २८ : २०
२०१५ : २२ : ३५
२०२० : २८ : ५५
------------
गुळाला वाढती मागणी
गुळापासून नवनवीन उपपदार्थ निर्मितीवर आता भर द्यायला हवा. गुळातील नैसर्गिक गुणधर्म वाढविण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे. त्यातून गावोगावी गुऱ्हाळ व्यवसाय सुरू होऊन तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.
प्रणय गाडे,
गुऱ्हाळ उद्योजक, युवा शेतकरी, श्रीरामपूर.
----------
प्रकृतीसाठी गूळ चांगला
साखर निर्मितीसाठी अनेक रासायनिक प्रक्रिया कराव्या लागतात. मात्र गुळाचे उत्पादन हे पारंपरिकरित्या केले जाते. तो गृह उद्योग आहे. प्राकृतिक दृष्टीने गूळ हा पटकन ऊर्जा निर्माण करणारा पदार्थ असल्याने लाभदायी आहे.
डॉ.महेश क्षीरसागर,
आहार तज्ज्ञ, श्रीरामपूर.
--------
गुळाचा चहा बनले स्टेट्स
शहरांमध्ये आता अनेक ठिकाणी गुळाच्या चहाचे हॉटेल्स उघडले आहेत. त्याला ग्राहकांची चांगली पसंती मिळत आहे. काही हॉटेल्समध्ये साखर व गूळ असा दोन्हीही चहांचा पर्याय दिला जातो.
------------