अहमदनगर : कोरोना रुग्णांची ऑक्सिजन पातळी किती आहे, यावरच उपचाराची दिशा ठरते. त्यामुळे ऑक्सिजनची पातळी मोजण्यासाठी ऑक्सिमीटरची मागणी वाढली असून, एका ऑक्सिमीटरसाठी सुमारे दोन ते अडीच हजार रुपये मोजावे लागत आहेत.
कोरोनाच्या गंभीर रुग्णांना कृत्रिम ऑक्सिजनची गरज भासते आहे. परंतु, रुग्णसंख्या वाढल्याने ऑक्सिजनचे बेड उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे ऑक्सिजन पातळीबाबत रुग्ण व त्यांचे नातेवाईक काळजी घेत आहेत. ही पातळी मोजण्यासाठी ऑक्सिमीटर आवश्यक असते. त्यात घरी उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे. त्यांची ऑक्सिजन पातळी वेळोवेळी मोजणे गरजेचे आहे. कारण ऑक्सिजन पातळी कमी झाल्यास धोका जास्त असतो. ऑक्सिमीटर हाताच्या बोटाला लावून ऑक्सिजनची पातळी मोजता येत असल्याने ऑक्सिमीटरची मागणी वाढली आहे. मागणीच्या प्रमाणात ऑक्सिमीटरचाही पुरवठा कंपन्यांकडून होत नाही. दिवसभरात एका मेडिकलमधून ४० ते ५० ऑक्सिमीटरची विक्री होत असून, त्यासाठी दोन ते अडीच हजार रुपये मोजावे लागत आहेत. याशिवाय एन -९५ मास्कची मागणी वाढल्याने तुटवडा निर्माण झाला आहे. शासनाने या मास्कचे दर निश्चित केले असून, एका मास्कची किंमत ३० रुपये आहे. हे मास्क मेडिकलमध्ये मिळत नाही. शिल्लक नाही, असे उत्तर दिले जाते. कंपन्यांकडून मास्क येत नाहीत. त्यामुळे तुटवडा निर्माण झाला असून, इतर कंपन्यांचेही मास्क बाजारात दाखल झालेले आहे. परंतु, या मास्कला फारशी मागणी नाही.
.....
- ऑक्सिमीटरची मागणी वाढली आहे. त्याप्रमाणात कंपनीकडून पुरवठा होत नाही. त्यामुळे तुटवडा निर्माण झाला असून, दीड हजार रुपयांना एक ऑक्सिमीटरची विक्री केली जात आहे. खरेदी दरातच वाढ झाल्याने किंमत वाढली आहे.
- दत्ता गाडळकर, अध्यक्ष मेडिकल असोसिएशन