करंजी येथे नवीन प्राथमिक उपकेंद्राची उभारणी केल्यास परिसरातील अनेक गावच्या लोकांची सोय होईल.
दिवसेंदिवस वाढत असलेली लोकसंख्या व साथीच्या रोगांचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता करंजीसह परिसरातील दगडवाडी, भोसे, वैजुबाभुळगाव, सातवड, त्रिभुवनवाडी, कौडगाव, खांडगाव, लोहसर, राघुहिवरेसह अनेक वाड्या -वस्त्यांवरील नागरिकांना कोणत्याही साथीच्या रोगाच्या लसीकरणासाठी मिरी किंवा तिसगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जावे लागते. ही दोन्हीही आरोग्य केंद्र या भागातील नागरिकांसाठी लांब व गैरसोईचे ठरत आहेत. त्यामुळे या भागातील अनेक नागरिक प्राथमिक उपचारापासून वंचित राहतात. प्रसंगी त्यांना आपला जीव गमवावा लागतो. अशा अनेक घटनाही परिसरात घडलेल्या आहेत. या सर्व प्रकाराची शासनाने गंभीर दखल घेऊन करंजी येथे अद्यावत व सुसज्ज आरोग्य केंद्र उभारल्यास या भागातील नागरिकांनी सोय होईल.
करंजी येथे प्राथमिक केंद्र आहे पण अतिशय लहान व अपुरे असल्याने येथे कर्मचाऱ्यांची संख्या कमी असून अत्याधुनिक सुविधा नसल्याने मिरी किंवा तिसगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जावे लागते.
या परिसरातील नागरिकांची सोय होण्यासाठी करंजी येथे सुसज्ज अद्यावत आरोग्य केंद्राची उभारणी करावी, अशी मागणी करंजीचे सरपंच बाळासाहेब अकोलकर, लोहसरचे सरपंच अनिल गिते, वैजुबाभुळगावचे रावसाहेब गुंजाळ, सातवडचे राजेंद्र पाठक, भोसे येथील विलास टेमकर, अशोक टेमकर, जोहारवाडीचे मच्छिंद्र सावंतसह, रफिक शेख, पृथ्वीराज आठरे, नवनाथ आरोळे, बाबा गाडेकर, रोहित अकोलकरसह यांनी केली आहे.
............
करंजी परिसरात सध्या कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र लस तिसगाव प्राथमिक केंद्रातच उपलब्ध आहे. हे आरोग्य केंद्र नागरिकांना लांब गैरसोईचे असल्याने नागरिक जात नाहीत. करंजी येथे अद्यावत आरोग्य केंद्राची गरज आहे.
-अनिल गिते, सरपंच, लोहसर
........................
फोटो - करंजीचे प्राथमिक आरोग्य केंद्र लहान असल्याने कर्मचाऱ्यांची संख्या कमी तसेच पुरेशी साधन सामुग्री उपलब्ध नाही