तीसगाव : पाथर्डी तालुक्यातील तीसगाव, माळीबाभूळगाव जिल्हा परिषद गटातील सर्व प्राथमिक शिक्षकांनी तीसगाव शहरातील कोविड सेंटरला विविध आरोग्य साहित्यांचे मोफत वितरण केले.
शंभर शुद्ध पेयजलाचे बॉक्स, एक हजार मास्क, पाच हजार रुपयांची आवश्यक औषधी, वाफ घेण्याचे आठ मशीन व ऑक्सिजन मीटर, पंचवीस लिटर सॅनिटायझर आणि महिनाभर पुरतील इतकी बिस्किटे, अंडी अशा विविधांगी उपयोगी एकूण पाच लाख रुपयांच्या वस्तूंचा यात समावेश आहे.
आ. मोनिका राजळे, जिल्हा परिषद सदस्य संध्या आठरे, पंचायत समिती सदस्य सुनील परदेशी आदींनी केलेल्या संयुक्त आवाहनाला शिक्षकांनी प्रतिसाद दिला. आर्थिक मदत जमा करून नेमक्या गरजेच्या साहित्यांची माहिती घेऊन खरेदी केली. शनिवारी माजी आ. शिवाजी कर्डिले यांच्या हस्ते या वस्तूंचे वितरण तीसगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारातील कोविड सेंटरमध्ये करण्यात आले.
तीसगाव ग्रामपंचायतीने या ठिकाणी पिण्याचे पाणी, पंखे, लाइटची व्यवस्था केली. ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी ५० तर जिल्हा परिषद सदस्या संध्या आठरे, पंचायत समिती सदस्य सुनील परदेशी यांनी ५० बेडची उपलब्धता केली. त्यामुळे रुग्णांची हेळसांड थांबली आहे, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. बाबासाहेब होडशीळ, डॉ. अर्चना लांडे यांनी दिली. जिल्हा परिषद सदस्य राहुल राजळे, युवा नेते पुरुषोत्तम आठरे, शिक्षक नेते कल्याण लवांडे, विजय अकोलकर, मिनीनाथ शिंदे, अनिल कराड, प्रवीण तुपे, संतोष पालवे, अण्णासाहेब आंधळे, महेश शेळके, संजय वांढेकर, अनिल शिंदे, गुणाजी दगडखैर आदी उपस्थित होते.