शिर्डी: पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात शिर्डी दौऱ्यावर येत असून त्यांच्या हस्ते साईसमाधी शताब्दीचा समारोप व विविध कामांचे भुमीपुजन केले जाणार आहे. यावेळी पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते निवासाची चावी देण्यात येणार आहे. त्यांच्यासमवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत.सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डी विमानतळावर उतरतील. तेथून ते हेलिकॉप्टरने शिर्डी संस्थानच्या हॅलिपॅडवर येतील. तेथून साईबाबा मंदीरात दर्शन व पूजा करतील. त्यानंतर शेजारील लेंडीबागेतील शताब्दी ध्वज उतरवतील. त्यानंतर सभास्थली येऊन विविध कामांचे व्हिडीओ कॉन्फरसिंगने भुमीपुजन करतील. पतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते निवासाची चावी देण्यात येणार आहे. संस्थानच्या दर्शनबारी, शैक्षणिक संकुल, साईगार्डन व नॉलेज पार्क व सोलर प्रोजक्टचे सांकेतीक भुमीपुजन पंतप्रधान मोदी करतील.या पार्श्वभुमीवर पोलीस अधिक्षक रंजनकुमार शर्मा यांनी वाहतुकीचे नियोजन केले आहे. संभाव्य गर्दी लक्षात घेवून १९ वाहन तळे तयार करण्यात आली आहेत. पोलीस अधिक्षक शर्मा यांच्या नेतृत्वाखाली ९ अतिरीक्त पोलीस अधिक्षक, १७ उपअधिक्षक, ५० निरीक्षक, १५० सहाय्यक व उपनिरीक्षक आणि २५०० पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्या, दहशतवाद विरोधी पथकाच्या चार टिम, बॉम्ब शोध पथकाच्या ९ टिम, शिघ्रकृती दलाची आठ पथके, दंगल नियंत्रणाची सहा पथके तैनात करण्यात आली आहेत. महत्वाच्या ठिकाणी अडीचशे कॅमेरे तसेच २५ व्हिडीओ कॅमेरे प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवत आहेत.याशिवाय नगर ते मनमाड दरम्यानची जड वाहतुक नगरच्या बाजुने कोल्हारपासून व मनमाडच्या बाजूने पुणतांबा फाट्यावरुन वळविण्यात आली आहे. भाविक किंवा स्थानिक नागरीकांची राहात्याकडून येणारी वाहने आरबीएल चौक-भाजी मंडई ते साईश कॉर्नर व कोपरगावकडून येणारी वाहने सावळेविहीर-रूई मार्गे शिर्डीत आणण्यात येत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शिर्डीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2018 9:26 AM