अहमदनगर : बांगलादेशमुक्ती संग्रामातील सहभागासंबंधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काय वक्तव्य केले, याबद्दल मला काही बोलायचे नाही. मात्र, ज्या देशाला आपण आजपर्यंत गरीब समजत होतो, त्याच्या प्रगतीचा वेग आपल्यापेक्षा जास्त आहे. त्यामुळे बांगलादेशाच्या दौऱ्यावर गेलेल्या पंतप्रधानांनी किमान त्यांच्या प्रगतीच्या सूत्राचा अभ्यास करून यावे,’ असा सल्ला महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिला.
मंत्री थोरात यांच्या उपस्थितीत शनिवारी नगरच्या काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक झाली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. बांगलादेशाच्या स्वातंत्र्यलढ्यात माझेही योगदान होते, असे पंतप्रधान मोदी यांनी विधान केले होते. याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर थोरात म्हणाले, याबद्दल मला काही बोलायचे नाही, मात्र बांगलादेशमुक्ती लढ्यातील दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे योगदान कोणालाच नाकारता येत नाही. परदेशात गेल्यावर का होईना मोदींनाही ते मान्य करावे लागते. आतापर्यंत आपण बांगलादेश हा गरीब देश मानत होतो. मात्र, सध्या या देशाने सर्वच क्षेत्रात मोठी प्रगती केल्याचे दिसून येते. त्याचा अभ्यास मोदींनी करावा. त्याचा उपयोग आपल्या देशात सत्ता चालविताना होत असलेल्या चुका सुधारण्यासाठी त्यांना होईल.
भाजप कुटील कारस्थान रचत आहे. राज्यात विरोधी पक्ष म्हणून हे कारस्थाने सुरू असताना केंद्रात सत्ता असून तेथेही तसेच वर्तन सुरू आहे. आपल्या राज्यघटनेत सर्वांना समान संधी दिली आहे; मात्र सध्याचे केंद्र सरकार मतांसाठी भेदभावाची दरी निर्माण करीत आहे. विकासकामे करता येत नसल्याने असे भेदभावाचे वातावरण तयार करून मते मिळविण्याचा उपाय भाजपने शोधला आहे. सगळ्याच बाबतीत भाजपची दुटप्पी भूमिका राहिली आहे. पूर्वी इंधनाची थोडी दरवाढ झाली, तरी ते आंदोलनासाठी रस्त्यावर उतरत असत. आता मात्र, आंदोलनांची चेष्ठा करत आहेत. कृषी कायद्यांच्या विरोधातील शेतकऱ्यांचे दीर्घ आंदोलन हे या सरकारचे मोठे अपयश आहे. अशा परिस्थितीत आता काँग्रेसशिवाय पर्याय नाही.
---------------