श्रीगोंदा : आढळगाव येथील देव नदीपात्रात सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर नगर येथील स्थानिक गुन्हे शाखेने मंगळवारी पहाटे छापा टाकून दोन जेसीबी मशीन, दोन ट्रॅक्टर, एक ट्रक आणि दोन दुचाकी असा ७५ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी रोहित मिसाळ यांनी फिर्याद दिली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस कर्मचारी रोहित मिसाळ, विजय वेठेकर, प्रकाश वाघ, रणजित जाधव, शिवाजी ढाकणे हे सोमवारी रात्रीच्या सुमारास फरार आरोपीचा शोधासाठी आढळगाव शिवारात आले होते. त्याच दरम्यान आढळगाव येथील देवनदीपात्रात वाळूउपसा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पथकाने पहाटेच्या दरम्यान नदीपात्रात छापा टाकला असता जेसीबी मशीनच्या सहाय्याने दोन ट्रॅक्टर व ट्रकमध्ये वाळू भरण्याचे काम सुरू होते. पोलीस पथकाने हे सर्व साहित्य जप्त करत चार जणांना ताब्यात घेतले. तर इतर तिघे अंधाराचा फायदा घेत पसार झाले. पोलीस पथकाने या कारवाईत ७५ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.अक्षय सुनील राहिंज , राहुल भास्कर लांडगे, (रा. काष्टी), महेश राजेंद्र भैलुमे (रा. आढळगाव), भाऊसाहेब जयशिंग सकट, (रा.सुरोडी), संतोष सुपेकर, संतोष मिसाळ, मंगेश मोटे (रा. श्रीगोंदा) व इतर तीन अनोळखी इसमाविरोधात वाळू चोरी, पर्यावरण संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव करत आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक ईशू सिंधू यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरिक्षक दिलीप पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली़
श्रीगोंद्यात वाळू उपशावर छापा; ७५ लाखांचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2019 1:26 PM