शिर्डी : जिरायत भागाला वरदान ठरणाऱ्या निळवंडे कालव्यांच्या कामांसाठी आवश्यक असलेल्या निधीबाबत राज्य शासन आचारसंहिता लागण्यापूर्वी सकारात्मक निर्णय घेईल, अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली़ गोदावरी आणि निळवंडे कालव्यांचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्याकरिता केंद्राच्या निधीच्या तरतुदीवरच अवलंबून न राहाता शिर्डी संस्थान किंवा कर्ज रोख्यांच्या माध्यमातून आर्थिक तरतूद करू किं वा यासाठी राज्य सरकार निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करील, असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले़ खडकेवाके येथे उभारलेल्या फळे, भाजीपाला निर्यात सुविधा व प्रक्रिया केंद्राचा लोकार्पण सोहळा रविवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला़ यावेळी मुख्यमंत्री चव्हाण बोलत होते. केंद्राचा निधी मिळवण्यासाठी एआयडीपीच्या सोळा परवानग्या मिळाल्या आहेत़ उर्वरित एक-दोन परवानग्यासाठी आपण केंद्राकडे पाठपुरावा करणार आहोत़ त्यानंतर केंद्राचा नव्वद टक्के निधी मिळू शकेल, असे ते म्हणाले. तत्पूर्वी या कार्यक्रमात कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनी निळवंडे कालव्यांच्या निधीसाठी ठोस निर्णय घ्यावा अशी मागणी केली़ साईसमाधी शताब्दीसाठी पाण्याची आवश्यकता असून बंद पाईपद्वारे निळवंडे धरणातील पाणी आणतांना शिर्डी बरोबरच दुष्काळी गावातील पाणी योजनांनाही याचा उपयोग होईल,यासाठी संस्थानकडून कर्जाऊ पाचशे कोटी रूपये घेता येतील, असेही विखे यांनी सुचवले़ शिवाय सध्या गोदावरीचा ओेव्हरफ्लो सुरू असून यातून पिण्याबरोबरच शेतीसाठीही आवर्तन सोडावे, अशी मागणीही विखे यांनी केली़ याप्रसंगी पणन राज्यमंत्री सुरेश धस, माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, आमदार भाऊसाहेब कांबळे, जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे आदी उपस्थित होते़(तालुका प्रतिनिधी) आंदोलकांना अटक...निळवंडे कालव्यांना निधी मिळावा यासाठी अनेक दिवसांपासून आंदोलने करणाऱ्या निळवंडे कालवे कृती समितीचे नानासाहेब शेळके, नानासाहेब जवरे आदींसह काही कार्यकर्ते सभामंडपात उपस्थित होते़ यावेळी पोलिसांनी घोषणाबाजीची शक्यता लक्षात घेऊन त्यांना बाहेर जाण्यास सांगितले़ याला नकार देताच पोलिसांनी लाठीमार करून कार्यकर्त्यांना बाहेर नेले़ यानंतर कृषिमंत्री विखे यांनी या कार्यकर्त्यांची मुख्यमंत्र्यांशी भेट घडवून आणली़ मुख्यमंत्री व विखे यांनी झालेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त करत निळवंडे संदर्भात त्यांचे म्हणणे ऐकून घेतले़ यानंतर जवळपास पंधरा ते वीस कार्यकर्त्यांना अटक करून श्रीरामपूर येथे हलवण्यात आले़
आचारसंहितेआधी ‘निळवंडे’च्या निधीचा निर्णय
By admin | Published: August 10, 2014 11:24 PM