नेवासा : पुणे येथून इलाहाबादकडे मजुरांना घेऊन जाणारी खासगी बस उलटून झालेल्या अपघातात चार मजूर किरकोळ जखमी झाले. ही घटना रविवारी (दि.१७ मे) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास नगर-औरंगाबाद महामार्गावर नेवासा फाटा येथे घडली. रविवारी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास पिंपरी चिंचवड येथून ही बस उत्तरप्रदेश राज्यातील इलाहाबादकडे २६ मजुरांना घेऊन निघाली होती. सदर खासगी बस (क्र. एम.एच.-१२, के.क्यू.-४२६८) नगर-औरंगाबाद महामार्गावरील नेवासा फाटा येथे रविवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास महामार्गावरील दुभाजकाला आढळून उलटली. लॉकडाऊन असल्याने रोडवर सध्या वाहनांची वर्दळ कमी आहे. यामुळे मोठा अपघात टळला. या अपघातात एक महिला व तीन पुरुष मजुरांना डोक्याला व हाताला किरकोळ जखम झाली आहे. उपचारासाठी नेवासा फाटा येथील खासगी दवाखान्यात नेण्यात आले. घटनास्थळी तहसीलदार रुपेश सुराणा, पोलीस निरीक्षक रणजीत डेरे, पोलीस हेडकॉन्स्टेबल बाळकृष्ण ठोंबरे, पोलीस नाईक महेश कचे यांनी पाहणी करून जखमींची विचारपूस केले. सदर मजूर हे स्व-खर्चाने उत्तरप्रदेशकडे जात असल्याचे पोलिसांनी केलेल्या चौकशीअंती समजले.
नेवासा फाटा येथे खासगी बस उलटली; चार मजूर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2020 11:27 AM