शेवगाव : तालुक्यात विविध ठिकाणी शनिवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची एकच धांदल उडाली होती. दरम्यान, तालुक्यातील देवटाकळी येथील एका खासगी शाळेचे, तर दहिगावने येथील घराचे पत्रे उडाल्याची घटना घडल्याचे तहसीलदार अर्चना पागिरे यांनी सांगितले.
सायंकाळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांची धांदल उडाली. तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांची खरीप हंगामपूर्व शेतीच्या मशागतीची कामे उरकली आहेत. शनिवारी झालेला पाऊस कपाशी लागवडीसाठी फायदेशीर असल्याने शेतकऱ्यांनी पाण्याचे नियोजन पाहून कपाशीची लागवड करण्यास हरकत नाही, असे कृषी अधिकारी कानिफनाथ मरकड यांनी सांगितले.
ज्या शेतकऱ्यांकडे कांदा साठवणूक करण्यासाठी सुविधा उपलब्ध नाही, अशा शेतकऱ्यांचा कांदा भिजून नुकसान झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, याबाबतची तक्रार अद्याप आलेली नाही, असे तालुका कृषी अधिकारी किरण मोरे यांनी सांगितले.