अहमदनगर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन शहरातील आरोग्य यंत्रणा पुन्हा सक्रीय झाली आहे. अधिकाधिक नागरिकांच्या संपर्कात येणारे व्यावसायिक, दुकानदार, फेरीवाल्यांची जागेवर जाऊन कोविड चाचणी केली जाणार असून, भरारी पथके कार्यान्वित करण्यात येणार आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने प्रशासकीय यंत्रणा पुन्हा सतर्क झाली आहे. मात्र सोशल डिस्टन्सींगचे नियम नागरिकांकडून पाळले जात नाहीत. शहरात दुकाने, मॉल, हाॅटेल, खाद्यपदार्थांच्या हातगाड्या आदी ठिकाणी गर्दी होत आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. या पाश्वभूमीवर दुकाने, फेरीवाले, दुधविक्रेते आदींची कोविड चाचणी करण्याची मोहीम महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून हाती घेण्यात येणार आहे. हे सुपर स्प्रेडर म्हणून ओळखले जातात. त्यामुळे सर्वप्रथम त्यांची चाचणी करण्यात येणार आहे. याबरोबरच एकापेक्षा जास्त रुग्ण आढळून आलेल्या इमारती सिल केल्या जाणार आहेत. कोरोना रुग्णांना होम क्वारंटाईनसाठी परवानगी दिली जाणार नाही, असे ही महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
.....
अधिकारी- कर्मचाऱ्यांना २,००० पर्यंत दंड
शासकीय कर्मचाऱ्यांनी मास्क वापरणे बंधनकारक आहे.परंत, शासकीय अधिकारी व कर्मचारीच मास्क वापरत नसल्याचे निदर्शनास आले आहे. मास्क न वापरणाऱ्यांना कार्यालयात प्रवेश दिला जाणार नाही. मास्क न वापरल्यास अधिकारी- कर्मचाऱ्यांना दोन हजार रुपयांपर्यंत दंड केला जाणार आहे.
......
पाच कोविड केअर सेंटर पुन्हा सुरू
शहरातील शासकीय तंत्रनिकेतन, आनंद लॉन, नटराज हॉटेल, जैन पितळे बोर्डींग, जिल्हा रुग्यालये हे पाच कोविड सेंटर कार्यान्वित करण्यात येणार असून, आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे.
....
५, ३६९ जणांना कोरोना लस
शहरातील ४ हजार ८०५ आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लस देण्यात आली आहे. तसेच ५६६ इतर कामगारांना लस देण्यात आली आहे.
....
- शहरातील वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेकडून उपाययोजना हाती घेण्यात येत आहेत. नागरिकांनी मास्क व सोशल डिस्टन्सींगचे नियम पाळून महापालिकेला सहकार्य करावे.
- डॉ. अनिल बोरगे, आरोग्य अधिकारी, महापालिका