जामखेड : शहरात १ फेब्रुवारी रोजी पंचायत समितीच्या कार्यालयासमोर डॉ. सादिक पठाण व कय्युम शेख यांच्यावर झालेला गोळीबाराच्या निषेधार्थ मंगळवारी जामखेडमध्ये मोर्चा काढण्यात आला.मंगळवारी (दि. ६) दुपारी १ वाजता इदगाह मैदान येथून या मूक मोर्चास सुरुवात झाला. पुढे बसस्थानक, खर्डा चौक, जयहिंद चौक, बीड रोडरॉबरीवरून कार्नर मार्गे हा मोर्चा तहसील कार्यालयावर पोहोचला. डॉ. सादिक पठाण व कय्युम शेख यांच्यावर गोळीबार करून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यामुळे कायदा सुव्यवस्था ढासळल्याचे सांगत जामखेडकरांनी हा मोर्चा काढला. गुंडांवरील पोलिसांचा वचक कमी झाला आहे. पोलिसांनी गुंडांवर कडक कारवाई करावी व कायदा सुव्यवस्था राखावी, असे निवेदनात म्हटले आहे. तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. हातात निषेधाचे फलक व घोषणाबाजी करीत हा मोर्चा तहसील कार्यालयावर पोहोचला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रा. मधुकर राळेभात, माजी जिल्हा परिषद सदस्य शहाजी राळेभात, मुस्लिम विकास परिषदेचे अध्यक्ष अझरुद्दीन काझी, भाजप अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष सलीम बागवान, भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष नामदेव राळेभात, शिवसंग्राम जिल्हा अध्यक्ष अमजद पठाण, अल्पसंख्याक कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष जमीर सय्यद, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष शरद शिंदे, भारिप बहुजन महासंघाचे तालुकाध्यक्ष बापूसाहेब गायकवाड, माजी नगराध्यक्ष विकास राळेभात, सामाजिक कार्यकर्ते विकी सदाफुले, नगरसेवक गुलशन अंधारे, डिगांबर चव्हाण, शामीर सय्यद, अमित जाधव, पवनराजे राळेभात, अवधूत पवार, मोहन जाधव, बापू चव्हाण आदी उपस्थित होते.
डॉक्टरवरील गोळीबार प्रकरणी जामखेडमध्ये निषेध मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2018 4:15 PM