अहमदनगर : अवसायनात निघालेल्या संपदा नागरी पतसंस्थेच्या बड्या कर्जदारांच्या मालमत्तेवर जप्ती आणण्याची कारवाई अवसायक मंडळाने सुरु केली असून, याबाबत अवसायक मंडळाने गुरुवारी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली़ संपदाच्या संचालकांच्या मालमत्ता जप्त कराव्यात अशी सूचना हजारे यांनी यावेळी केली़अवसायक मंडळाचे प्रमुख व राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, वसंत लोढा, सुरेश म्हस्के, चंद्रभान खुळे यांनी राळेगणसिद्धी येथे हजारे यांची गुरुवारी भेट घेतली़ संपदा पतसंस्थेच्या पारनेर तालुक्यातील बड्या कर्जदारांच्या मालमत्ता सील करण्यात आल्याचे अवसायक मंडळाने हजारे यांना सांगितले़ वसुली पथकाने कर्जदारांच्या जंगम मालमत्तेचा पंचानामा करुन पारनेर, सुपा, पवारवाडी येथील चार बड्या कर्जदारांवर जप्तीची कारवाई अवसायक मंडळाने केली आहे़ यामध्ये संपत पवार यांच्या हॉटेल लोकसेवाला अवसायक मंडळाने सील ठोकले़ तर मयत कर्जदार संतराम तामखेडे यांचे वारस सचिन तामखेडे यांची जंगम मालमत्ता, सुनीता दिलीप औटी यांचे सेतू कार्यालय, अरुण पवार व आनंदा पवार यांची जंगम मालमत्ता सील केल्याचे अवसायकांनी हजारे यांना सांगितले़ तसेच थकीत कर्जदारांच्या घरी जाऊन कर्जाची रक्कम तात्काळ भरण्याची समज वसुली पथकाने दिली़ काही कर्जदारांनी थकीत कर्ज फेडण्याचे आश्वासन अवसायक मंडळाला दिले आहे़ त्यामुळे संपदा पतसंस्थेतील ठेवीदारांना लवकरच ठेवी परत मिळतील, असे वसंत लोढा यांनी सांगितले़ कारवाईत वसुली अधिकारी अॅड़ सुशांत वाडिले, संजीव हंबारे, बाळासाहेब नवघरे यांनी सहभाग घेतला़ हॉटेल लोकसेवाचे सील तोडल्याप्रकरणी अवसायक मंडळाने हॉटेल मालकाविरुद्ध सुपा पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याचे अवसायक मंडळाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे़ (प्रतिनिधी)
कर्जदारांच्या मालमत्ता जप्त
By admin | Published: September 11, 2014 10:58 PM