अहमदनगर : जिल्ह्यात आतापर्यंत तीन हजारपेक्षा जास्त संशयितांच्या स्त्रावाचे नमुने तपासण्यात आले. त्यामध्ये २१७ जण कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यामुळे संशयितांमध्ये कोरोनाची बाधा झालेल्यांचे हे प्रमाण सहा टक्के आहे. ३ हजार ७३ जणांपैकी जिल्ह्यात २१७ जणांनाच कोरोनाची बाधा झाल्याचे आढळून आले आहे.
नगर जिल्ह्यात तपासणीसाठी २ हजार ८५८ जणांना हॉस्पिटलमध्ये बोलविण्यात आले होते. अहमदनगरमध्ये सोमवारी १४८ जणांना तपासणीसाठी घेण्यात आले होते. जिल्हा रुग्णालय-६१, एम्स हॉस्पिटल-८,जिल्हा रुग्णालय-८, बूथ हॉस्पिटल-६८, प्रवरा मेडिकल ट्रस्ट-३, शिर्डी-१, आत्मा मालिक हॉस्पिटल-१, कोपरगाव-१, संगमनेर-१ जणाला तपासणीसाठी घेण्यात आले होते. आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये ९ जणांचा जिल्हा रुग्णालयात, तर दोन जणांचा घरीच मृत्यू झाला असून मृत्युनंतर त्यांना कोरोना झाल्याचे आढळून आले होते.
सध्या ९२० जणांना होम क्वारंटाईन, ४७७ जणांना संस्थात्मक क्वारंटाईन तर ६९ जणांना जिल्ह्यात विविध ठिकाणी क्वारंटाईन करण्यात आले आहे. आतापर्यंत १२१ जण बरे झाले आहेत. त्यामध्ये २६ जण मुंबई येथून आलेले, तर दोन पुणे येथून आलेले आहेत.
सध्या ८५ जणांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात क्वारंटाईन करण्यासाठी २८ ठिकाणी व्यवस्था करण्यात आली असून तिथे ३ हजार २९५ बेडस्ची व्यवस्था करण्यात आली आहे. चार ठिकाणी विलगीकरण कक्ष असून तेथे ८९० बेडस्ची व्यवस्था करण्यात आलेली आहे, असे जिल्हा प्रशासनाच्या अहवालात म्हटले आहे.
बारा जणांचा दुसरा अहवाल पॉझिटिव्ह
अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना बूथ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे त्यांची १४ दिवसानंतर दुसरी चाचणी घेतली जाते. दुस-या चाचणीमध्ये आतापर्यंत १२ जण पुन्हा पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. निगेटिव्ह आढळून आलेल्यांची संख्या २ हजार ७३७ इतकी आहे.