शिर्डी : साईबाबांच्या २०१८ साली साजऱ्या होणाऱ्या समाधी शताद्बी महोत्सवाच्या निमित्ताने शहरातील विविध विकासकामांसाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली असून १ हजार १०४ कोटींचा प्रस्ताव शासनास सादर करण्यात आला आहे़ रस्ते,पाणी,वीज,आरोग्य या पायाभूत सुविधांबरोबरच शताद्बी महोत्सवाच्या निमित्ताने देशभरातून येणाऱ्या भाविकांच्या सुविधांसाठी आवश्यक असणाऱ्या सुविधांचा विकास आराखड्यात समावेश करण्यात आल्याची माहिती कृषी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली़आगामी सिंहस्थ पर्व विचारात घेऊन हाती घ्यावयाच्या १५३ कोटी रूपये खर्चाच्या विविध पायाभूत सोयी सुविधा निर्माण करण्यासाठीचा प्रस्ताव तयार केला असून त्यासाठीही केंद्र व राज्य शासनाकडून निधी मिळवण्यासाठी पाठपुरावा करण्यात येत असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले़ साईबाबांचा समाधी शताद्बी सोहळा २०१८ साली मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येत आहे़ या सोहळ्याला जगभरातून भाविक हजेरी लावणार आहेत़ त्यादृष्टीने राज्य शासनाने नांदेडच्या धर्तीवर शताद्बी सोहळ्याची तयारी सुरु केली आहे़ या संदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या राज्यस्तरीय समितीच्या माध्यमातून शिर्डीतील पायाभूत सुविधांना आणि विकास कामांना मंजुरी मिळवण्याच्या दृष्टीने विकास आराखडा तयार करण्यात आला आहे़ या कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध व्हावा त्यादृष्टीने सर्व विभागाच्या माध्यमातून पाठपुरावा सुरू असल्याचेही ते म्हणाले. (तालुका प्रतिनिधी) रस्त्यांसाठी १२ कोटीयापूर्वीच शिर्डीतील तीस किमी लांबीच्या रस्त्यासाठी २१ कोटी ३ लाख रूपये महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान योजने अंतर्गत मंजूर झाले आहेत़ शहरातील सुधारित पाणी योजनेसाठी शासनाने २२ कोटी ६२ लाख रूपये मंजूर केल्याचेही विखे यांनी सांगितले़ शिर्डी संस्थानच्या निधीच्या माध्यमातून नगरपंचायत हद्दीतील रस्ते विकासासाठी दोन टप्प्यात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी निधी उपलब्ध करुन दिला असून एकूण ३४ किमी लांबीच्या रस्त्यांसाठी पहिल्या टप्प्यात ८८ तर दुसऱ्या टप्प्यासाठी ४७ कोटी २ लाख रूपये मंजूर झाले आहेत़सुरक्षेवर भरशहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहे,पादचारी मार्ग आणि भुयारी मार्गाच्या विकासासाठी देखील प्रस्ताव सादर करण्यात आले असून त्याच मार्गावर विद्युत पोल उभारणी,पथदिवे उभारणी,जनरेटर संच,शहरातील सिग्नल उभारणीसाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत़ शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्यात येणार आहे़ शहरातील घनकचरा व्यवस्थापना बरोबरच जंतुनाशक फवारणी यंत्र, फॉगिंग मशीनबाबतचा प्रकल्प अहवाल नगरपालिका संचालनालयाकडे तर अग्निशमन केंद्र व आपत्कालीन व्यवस्थापनासाठी निधी मिळवण्यासाठीही प्रस्ताव सादर करण्यात आला आहे़ शिर्डीच्या विकास आराखड्यात आरक्षित करण्यात आलेल्या जागेवर वाहनतळांची व्यवस्था करण्यात येणार आहे़ नगर मनमाड रस्त्याचे काम प्राधान्याने हाती घेण्यात आले असून हे काम नियोजित वेळेत पूर्ण व्हावे यासाठी पाठपुरावा करण्यात येत असल्याचेही विखे यांनी सांगितले़
साईसमाधी शताद्बीसाठी ११०० कोटींचा प्रस्ताव
By admin | Published: September 11, 2014 11:17 PM