नगर जिल्ह्याची ५० लाखांच्या पुढे लोकसंख्या आहे. त्या तुलनेत जिल्ह्यात सध्या अवघे तीन हजार पोलीस बळ कार्यरत आहे. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या अहवालानुसार २०२० या वर्षांत गुन्हेगारीत नगर जिल्हा महाराष्ट्रात प्रथम स्थानी आहे. सर्व प्रकारचे गुन्हे नगर जिल्ह्यातच सर्वाधिक प्रमाणात घडत असल्याचे या अहवालात नमूद आहे. वाढती गुन्हेगारी रोखने, गुन्ह्यांचा तपास, व्हीआयपी बंदोबस्त, सन, उत्सव काळातील बंदोबस्त, तसेच गेल्या वर्षभरापासून कोरोना संदर्भात लागू करण्यात आलेल्या नियमांची अंमलबजावणी आदी कामांचा पोलिसांवर मोठा ताण आहे. अशा परिस्थितीत नगरसाठी वाढीव पोलीस द्यावेत, अशी मागणी शासनाकडे करण्यात आलेली आहे. वाढीव मनुष्यबळासह प्रस्तावित पोलीस ठाण्यांसाठीही शासनाकडे पाठपुरावा सुरू असल्याचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी सांगितले.
-------------------------
३८ हजार ८१६ गुन्ह्यांची नोंद
मागील वर्षात जिल्ह्यात आयपीसी कलमांतर्गत तब्बल ३८ हजार ८१६ गुन्ह्यांची नोंद आहे. यामध्ये खून, दरोडा, चोऱ्या, जबरी चोऱ्या, हुंडाबळी अत्याचार आदी गुन्ह्यांचा समावेश आहे. तसेच शरीराविरुद्धच्या गुन्ह्यातही नगर जिल्हा इतर जिल्ह्याच्या तुलनेत पुढे असल्याचे राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या अहवालात नमूद आहे.
----------------------------------
नगर जिल्हा हा विस्ताराने मोठा व मध्यवर्ती आहे. नगरला सात जिल्ह्याच्या सीमा जोडलेल्या आहेत त्यामुळे येथील गुन्हेगार जसे बाहेर जाऊन गुन्हे करतात तसेच बाहेरील गुन्हेगारही नगरमध्ये येऊन गुन्हे करतात. अशा परिस्थितीत आहे त्या मनुष्यबळाचा योग्य वापर करून गुन्हे उघडकीस आणले जात आहेत. वाढीव ५०० पोलीस बळ मिळावे यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविला असून प्रस्तावित पोलीस ठाणे कार्यरत होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
- मनोज पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक, अहमदनगर