शिर्डी : देशभरातील प्रमुख मंदिराच्या माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी देशपातळीवर प्रमुख देवस्थानांचे फेडरेशन करण्याचा प्रस्ताव साईसंस्थानचे सीईओ कान्हुराज बगाटे यांनी तिरूपती देवस्थानासमोर ठेवला आहे.
कोविडच्या पार्श्वभूमीवर तिरुपती देवस्थानने केलेल्या उपाययोजनांची पाहणी करण्यासाठी बगाटे यांनी अधिका-यांसह तिरूपतीला भेट दिली. यावेळी त्यांनी हा प्रस्ताव दिला. देशातील प्रमुख देवस्थानांची एकच वेबसाईट करून फेक वेबसाईटच्या माध्यमातून होणारी भाविकांची फसवणूक यातून रोखता येईल. सर्व देवस्थानांची वर्षातून एकदा बैठक घेता येईल, असा प्रस्ताव बगाटे यांनी मांडला असून त्यास तिरूपती देवस्थानने अनुकूलता दर्शवली आहे.
बगाटे म्हणाले, राज्य सरकारने आदेश दिल्यानंतर दुस-या दिवशी मंदिर उघडता येईल. त्यादृष्टीने आपण तयारी करत आहोत. तिरूपती देवस्थानमध्ये सध्या रोज बारा हजार भाविक दर्शन घेत आहेत. तेथे प्रसादालय, लाडू प्रसाद सुरू आहे. आरोग्य सेतू मार्फत कोरोनाबाधित भाविकांवर नजर ठेवण्यात येत आहे. याशिवाय केवळ आॅनलाईन बुकिंग करणारांनाच दर्शन देण्यात येत आहे. लहान मुले व वृद्धांना दर्शनास तुर्तास परवानगी देण्यात आलेली नाही. ट्रायझोन मशिन बसवण्यात आले आहे. यातून बाहेर पडणारा ओझोन कोरोनाच्या जंतूसंसर्गावर मात करण्यास प्रभावी आहे. या प्रकारची मशिनरी शिर्डीतही बसवण्याबाबत प्रयत्न करण्यात येणार आहे. तिरूपतीमध्ये भाविकांच्या चोºया व लुटमार रोखण्यासाठी सीसी सर्व्हलन्सला आरोपींचे फोटो टाकून फेस डिटेक्शनद्वारे आरोपी शोधण्यात येतात. शिर्डीतही ही पद्धत अवलंबण्यात येणार असल्याचे बगाटे यांनी सांगितले.