करंजी : प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मंजुरीसाठी लागणारी २५ हजार लोकसंख्या असूनही करंजी (ता. पाथर्डी) प्राथमिक आरोग्य केंद्राचा प्रस्ताव चार वर्षांपासून शासनाकडे पाठवूनही धूळखात पडून आहे. सध्या येथील आरोग्य उपकेंद्र शोभेची वास्तू ठरत आहेत. त्यामुळे लसीकरणासाठी येणाऱ्या नागरिकांची ससेहोलपट होत आहे.
करंजीसह परिसरात देवराई, लोहसर येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आहेत. सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता या उपकेंद्रात अपुरे कर्मचारी, कोणतीही सुविधा उपलब्ध नसल्याने परिसरातील नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. करंजी येथील उपकेंद्रात फक्त ४ कर्मचाऱ्यांची नेमणूक आहे. त्यातील २ जागा रिक्त आहेत. करंजीपासून २ ते ८ किलोमीटर अंतरावरील गावांची २०११ च्या जनगणनेनुसार एकूण लोकसंख्या २२ हजाराच्या जवळपास आहे.
करंजी - ५०६७, दगडवाडी - १२४७, भोसे - १२८२, सातवड - ८४०, लोहसर - २०१७, खांडगाव - १३९७, वैजूबाभूळगाव - १४७४, जोहारवाडी - ९७०, राघोहिवरे - ११६३, देवराई - १०००, घाटसिरस - २८०३, त्रिभुवनवाडी - ८६७, कौडगाव - १२१७ अशी आहे. या लोकसंख्येत गेल्या १० वर्षात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. ही सर्व गावे पक्क्या रस्त्याने करंजी गावास जोडलेली आहेत.
करंजी येथे अद्ययावत प्राथमिक आरोग्य केंद्राची गरज लक्षात घेऊन चार वर्षांपूर्वीच ग्रामपंचायतीने ठराव करून प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता. मात्र, चार वर्षात शासन दरबारी काहीच हालचाल न झाल्याने हा प्रस्ताव धूळ खात पडून आहे.
कल्याण - निर्मळ महामार्गावरील करंजी गावाची लोकसंख्या सात हजारांच्या पुढे गेली आहे. संपूर्ण परिसरातील गावांची एकूण लोकसंख्या ३० हजारांच्या पुढे गेली असताना या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मंजुरीचे घोडे अडले कोठे? या प्राथमिक आरोग्य केंद्रास शासनाने वेळीच मान्यता दिली असती तर नागरिकांची गैरसोय टळली असती. या प्राथमिक आरोग्य केंद्रास त्वरित मंजुरी द्यावी, अशी मागणी बाळासाहेब अकोलकर, अनिल गिते, रफीक शेख, राजेंद्र पाठक, पृथ्वीराज आठरे, रावसाहेब गुंजाळ, गणेश पालवे, मच्छिंद्र सावंत, विलास टेमकर, रोहित अकोलकर, बाबा गाडेकर, नवनाथ आरोळे आदींनी केली आहे.
---
मी ग्रामपंचायतीमध्ये सत्तेत असताना चार वर्षांपूर्वी या परिसरातील नागरिकांची सोय व्हावी म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्राचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता.
-रफीक शेख,
शिवसेना नेते, करंजी
--
प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी आजही करंजी ग्रामपंचायतीकडे जागा आहे. परिसरातील नागरिकांच्या सोयीसाठी अद्ययावत प्राथमिक आरोग्य केंद्र होणे गरजेचे आहे.
-बाळासाहेब अकोलकर,
सरपंच, करंजी
---
०९करंजी१