रेशनचा गहू काळ्या बाजारात विकणारे भागा खंडू बाबर यांच्याविरूद्ध लोकजागृती सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते दत्तात्रय मोहन पवार यांनी पोलिसांकडे तक्रार केली होती. या तक्रारीची पोलीस व महसूलच्या पुरवठा विभागाने दखल घेतली नाही. त्यानंतर पवार यांनी याविषयी चौकशीची मागणी केली. परंतु कोणीही दखल न घेतल्यामुळे त्यांनी अखेर न्यायासाठी औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली. न्यायालयाच्या आदेशानंतर झालेल्या चौकशीत चार अधिकाऱ्यांनी कर्तव्यात कसूर केल्याचे उघड झाले. यामध्ये पारनेरचे तत्कालीन पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे, उपनिरीक्षक संजय मातोंडकर, सहाय्यक फौजदार अशोक निकम, गंगाधर फसले यांचा समावेश आहे. कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका यांच्यावर ठेवण्यात आला आहे. कसुरीनंतर प्रस्तावित असलेल्या कारवाईचा अहवाल पोलीस अधीक्षकांनी न्यायालयात सादर केल्यानंतर यावर तक्रारदार समाधानी आहे की नाही, असे त्यांनी पुढील तारखेपूर्वी न्यायालयाला सांगावे, असेही आदेशात म्हटले आहे. या प्रकरणाचा पुढील निर्णय २२ मार्चपर्यंत पुढे ढकलण्यात आलेला आहे. याप्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती टी. व्ही. नलावडे व न्यायमूर्ती बी. यू. देबावार यांच्या समोर सुरू आहे. तक्रारदाराची बाजू ॲड. दत्तात्रय मरकड मांडत आहेत.
तक्रार दडपल्यामुळे पोलिसांवर शिस्तभंगाचा प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 4:20 AM