अहमदनगर : राज्यभर गाजलेल्या खर्डा (ता. जामखेड) येथील नितीन आगे खून खटल्यात २६ पैकी महत्त्वाचे १४ साक्षीदार फितूर झाल्याने सर्व आरोपी निर्दोष सुटले. या फितूर साक्षीदारांविरोधात न्यायालयात अर्ज करणार असल्याचे फिर्यादीतर्फे खटला चालविणारे सरकारी वकील अॅड. आर. के. गवळी यांनी सांगितले.खर्डा येथे बारावीत शिक्षण घेत असलेला दलित समाजातील युवक नितीन राजू आगे याची प्रेमप्रकरणातून २८ एप्रिल २०१४ रोजी दहा ते पंधरा जणांनी हत्या केली होती. नितीन याला तो शिक्षण घेत असलेल्या खर्डा येथील न्यू इंग्लिश स्कूल येथून ओढत नेऊन त्याला मारहाण करून त्याचा मृतदेह झाडाला लटकविण्यात आला होता. या घटनेनंतर मयत नितीन याचे वडील राजू नामदेव आगे यांनी जामखेड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. या प्रकरणाचा तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी धीरज पाटील यांनी तपास करून जिल्हा न्यायालयात १० जणांविरोधात २४ जुलै २०१४ रोजी दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्याची २६ नोव्हेंबर २०१६ रोजी सुनावणी सुरू झाली झाली. खटल्यात महत्त्वाचे असलेले १४ साक्षीदार फितूर झाल्याने सर्व नऊ आरोपी निर्दोष सुटले. दहा पैकी एका आरोपीचा आधीच मृत्यू झाला होता. या खटल्यात मयत नितीनचे आई-वडील, दोन बहिणी, शवविच्छेदन करणारे डॉक्टर, तपासी अधिकारी व विशेष न्यायदंडाधिकारी यांनीच साक्ष दिली होती. जिल्हा न्यायालयाने दिलेल्या निकालाविरोधात उच्च न्यायालयात अपील करणार असल्याचे अॅड. गवळी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
हे साक्षीदार झाले फितूर
सदाशिव आश्रू होडशिळ (मयताच्या पंचनामा प्रसंगी उपस्थित पंच), विकास कचरू डाडर (घटनास्थळाचा पंच), रमेश भगवान काळे (नितीन आगेला मारहाण करताना आरोपीला पाहिले होते), रावसाहेब उर्फ बबलू अण्णा सुरवसे (नितीनला आरोपी मोटारसायकलवर घेऊन जाताना पाहिले होते), लखन अशोक नन्नवरे (घटनेची माहिती असलेला साक्षीदार), बाबासाहेब रमेश सोनवणे (आरोपीची मोटारसायकल जप्त केली त्यावेळचा पंच), अशोक विठ्ठल नन्नवरे (नितीन याला घेऊन जात असताना आरोपींना पाहिले होते), हनुमंत परमेश्वर मिसाळ (नितीन याचा वर्ग मित्र), राजू सुदाम जाधव.(आगे याला मारहाण करताना आरोपीला पाहिले होते, कोणत्या साक्षीदाराने काय पाहिले याचा दोषारोपपत्रात उल्लेख आहे.)
शिक्षकांनीही फिरविली साक्ष
खर्डा येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये आरोपींनी नितीन याला मारहाण करून मोटारसायकलवर बसवून रानात नेले होते. यावेळी शिक्षक बाळू ज्ञानेश्वर जोरे, साधना मारूती फडतारे, राजेंद्र बाजीराव गिते व परिचर विष्णू गोरख जोरे, संदीप मुरलीधर डाडर हे उपस्थित होते. पोलिसांनी या सर्व साक्षीदारांचे जबाब घेतले होते. न्यायालयात मात्र पोलिसांनी दमबाजी करून आमचे जबाब घेतले असे या साक्षीदारांनी सांगितले.