आॅनलाईन लोकमतअहमदनगर, दि़ २६ - नगर तालुका खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून २५ ते २९ पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. संघाच्या १७ जागांसाठी २५ जूनला मतदान होणार आहे. सत्ताधारी आ. शिवाजी कर्डिले यांनी गड राखण्यासाठी तर शिवसेना-काँग्रेस यांच्या महाआघाडीने गड जिंकण्यासाठी मोर्चेबांधणी केली आहे़नगर तालुका खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने राजकीय घडामोडी गतिमान झाल्या आहेत. एकूण १७ जागांमध्ये सहकारी संस्था प्रतिनिधींच्या १० जागा असून व्यक्तिगत प्रतिनिधीच्या ७ जागा आहेत़ यात एक जागा अनुसूचित जातीसाठी, २ जागा महिला प्रतिनिधीसाठी, इतर मागासवर्गीय साठी १ जागा, भटक्या जाती-जमातीसाठी १ जागा राखीव आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी प्रारंभ झाला असून अर्ज दाखल करण्याची मुदत २९ मे पर्यंत आहे. यानंतर ३० मे रोजी अर्जांची छाननी होणार आहे. उमेदवारी अर्ज माघारीसाठी ३१ मे ते १४ जून पर्यंत मुदत आहे. चिन्ह वाटप १५ जून रोजी होणार असून २५ जून रोजी मतदानाची प्रक्रिया होणार आहे त्याच दिवशी सायंकाळी मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येणार आहे.आमदार शिवाजी कर्डिले यांच्या ताब्यात नगर तालुका खरेदी विक्री संघाची सत्ता आहे़ कर्डिले यांनी गड राखण्यासाठी तर शिवसेना-काँगे्रस महाआघाडीचे नेते प्रा़ शशिकांत गाडे यांनी खरेदी-विक्री संघाचा गड जिंकण्यासाठी लढाईची तुतारी फुंकली आहे़
आमदार कर्डिलेंची गड राखण्यासाठी तर गाडेंची गड जिंकण्यासाठी लढाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2017 12:06 PM