नागरिकांची सुरक्षा करणाऱ्या कोरोना योद्धांवर असे भ्याड हल्ले झाल्यास त्यांचे मनोधैर्य खचले जात आहे. कायदा व सुव्यवस्थेला आव्हान देणाऱ्या या घटनेमुळे गुंडप्रवृत्तीच्या लोकांचे मनोबल वाढले आहे. कुठल्याही राजकीय दबावाला बळी न पडता या गंभीर घटनेची सखोल चौकशी करावी, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली. तुमसर-मोहाडी विधानसभेचे (जिल्हा. भंडारा) संपर्कप्रमुख नरेश माळवे, संगमनेर शिवसेना शहरप्रमुख अमर कतारी आदींनी पोलिसांना निवेदन दिले.
या हल्ल्याचा भारतीय जनता पक्षाच्या युवा माेर्चा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निषेध नोंदवत पोलिसांना निवेदन दिले. युवा माेर्चाचे शहराध्यक्ष दिपेश ताटकर, किशोर गुप्ता, अक्षय अमृतवाड, सागर भोईर, प्रकाश रंधे, शुभम बेल्हेकर, शुभम कोकणे, संतोष नवले, राहुल भोईर, अजिंक्य उपासनी आदींची या निवेदनावर नावे आहेत. त्याचबरोबर बजरंग दल, शिवजयंती उत्सव युवक समिती, एकलव्य आदिवासी बहुउद्देशीय सामाजिक संस्था, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आदींच्या वतीनेही हल्ल्याचा निषेध करण्यात आला.
--------------
कुटुंब फाउंडेशनकडून रास्ता रोको
पोलिसांवर जमावाकडून झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी कुटुंब फाउंडेशनचे सदस्य शहरातून जाणाऱ्या जुन्या नाशिक-पुणे महामार्गावर गणेशनगर परिसरात एकत्र जमले होते. फाउंडेशनच्या सदस्यांनी रास्ता रोको आंदोलन करत पोलिसांना निवेदन दिले. हल्लखोरांना अटक करत त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.