घोडेगाव : रोहित्रावरुन थेट कृषी पंपांचा वीज पुरवठा खंडित केल्याच्या निषेधार्थ महावितरणच्या घोडेगाव (ता. नेवासा) कार्यालयातील उपअभियंत्याला सोमवारी शेतक-यांनी घेराव घालून जाब विचारला.नेवासा तालुका शेतकरी सुकाणू समितीचे कॉ. बाबा आरगडे, बन्सी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. शेतक-यांसमोर आज अनेक समस्या आहेत. शेतक-यांचे आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. कपाशीचे पीक बोंड अळीने वाया गेले. यंदा पाणीस्थिती चांगली असताना वीज जोड थकबाकीच्या नावाखाली तोडले जाऊन रोहित्रच बंद करण्यात येत आहे. महावितरण शेतक-यांवर सुलतानी संकट लादत असून ब्रिटिशांनी जेवढे अत्याचार केले नाहीत इतकी महावितरण शेतक-यांची लूट करीत असल्याची टीका आरगडे यांनी केली. बोअर, विहिरीला पाणी नसतांनाही वीज बिल दिले जाते, मीटर असूनही सरासरी बिले का? मग तुम्हाला काहीच नियम कसे नाहीत, अशा शब्दात आरगडे यांनी अधिका-यांना सुनावले.शासनाच्या आदेशानुसार थकीत वीज बिलाच्या वसुलीसाठी वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. बिलाचा किमान एक हप्ता भरल्याशिवाय आपण काही करू शकत नाही, असे अधिका-यांनी स्पष्ट केले. ज्या शेतकºयांनी वीज बिल भरले आहे त्यांनाही वीज मिळत नाही. आमची वीज खंडित करण्याचे कुठल्या नियमात आहे. आम्ही नुकसान भरपाई संदर्भात ग्राहक मंचात जाणार आहे, अशा शब्दात शेतक-यांनी सुनावले.यावेळी सुकाणू समितीचे गणेश झगरे, संतोष काळे, संभाजी माळवदे , पांडुरंग होंडे, त्रिंबक भदगले तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तर रस्त्यावर उतरु
कृषी पंपांचे वीज बिल भरण्यास महिन्याची मुदत द्या. विनंती करूनही आडमुठी भूमिका का घेता? यामुळे पेरण्या, लागवडी खोळंबून शेतकरी आणखी अडचणीत येतील. कामात सुधारणा करा, अन्यथा पूर्व सूचना न देता महावितरण विरोधात रस्त्यावर उतरु, असा इशाराही बन्सी सातपुते यांनी दिला.