संगमनेर : गाईचे दुधाला प्रतिलीटर ३५ तर म्हशीचे दुधाला प्रतिलीटर ६० रूपये भाव मिळाला पाहिजे. दुधाला एमआरपी आणि रेव्हेंन्यू शेअरिंग कायदेशीर संरक्षण द्यावे. दुधाच्या भेसळ मुक्तीची कायदेशीर हमी द्या. आदी मागण्यांच्या संदर्भाने मंगळवारी (दि.०५) येथील यशवंतराव चव्हाण प्रशासकीय भवनावर अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. यावेळी दूध रस्त्यावर ओतून भाजप सरकारचा निषेध करण्यात आला.
अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय सहसचिव डॉ. अजित नवले यांच्या मार्गदर्शनाखाली मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष कार्यालयापासून मोर्चाला सुरूवात झाली. यात दूध उत्पादक शेतकरी, अखिल भारतीय किसान सभा, शिवसेना, (उद्धव बाळासाहेब ठाकरे) छात्रभारती विद्यार्थी संघटना आदींचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मुजीब शेख, संगमनेर तालुकाप्रमुख भाऊसाहेब हासे, शहरप्रमुख अमर कतारी, छात्रभारती विद्यार्थी संघटनेचे राज्य कार्यवाह अनिकेत घुले यांसह सदाशिव साबळे, नामदेव भांगरे, एकनाथ मेंगाळ, नंदू गवांदे, सारंगधर तनपुरे, ॲड. ज्ञानेश्वर काकड, ताराचंद विघे, मथुरा बर्डे, भाऊसाहेब मेंगाळ, शांताराम तळपे, कैलास खंडागळे, पूजा शेंडगे, जुम्मादिन शेख, कैलास पापळ, संजय पवार, स्वाती तोरपे, सुनील माळी, शिवाजी वारे, साहेबराव घोडे, देविदास पवार आदी मोर्चात सहभागी झाले होते. प्रशासकीय भवनावर मोर्चा आला असता त्याचे रूपांतर सभेत झाले. येथे अनेकांची भाषणे झाली. भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.