अहमदनगर : केंद्र व राज्य शासनाच्या अनेक योजनांच्या माध्यमातून आरोग्य सेवा पुरविल्या जातात. जिल्ह्यात अत्याधुनिक वैद्यकीय सोयी-सुविधांच्या उपलब्धतेसाठी आवश्यक निधीसाठी आपण प्रयत्नशील असल्याचे सांगतानाच बाळासाहेब देशपांडे दवाखान्याने सेवेच्या माध्यमातून जिल्ह्यात नावलौकिक मिळविला असल्याचे गौरवोद्गगार पालकमंत्री राम शिंदे यांनी काढले.महानगरपालिकेच्या (कै.) बाळासाहेब देशपांडे दवाखान्याच्या रक्तपेढीतील रक्तविघटन प्रयोगशाळेचे उद्घाटन व लोकार्पण पालकमंत्री प्रा. शिंदे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.पालकमंत्री शिंदे म्हणाले, रुग्णसेवेच्या माध्यमातून देशपांडे दवाखान्याचा जिल्ह्यात नावलौकिक आहे. गोरगरीब, मध्यमवर्गीय व सर्वांनाच दवाखान्यातील सोईसुविधांचा लाभ होत आहे. दवाखान्यासाठी आवश्यक सोईसुविधासोबतच नूतनीकरणासाठी लागणाऱ्या निधीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. लगतच्या जिल्ह्यातूनही अनेक रुग्ण उपचारासाठी येथे येतात. त्यादृष्टीने जिल्ह्यात वैद्यकीय सोयीसुविधांच्या उपलब्धतेसाठी आपण प्रयत्नशील आहोत.खासदार दिलीप गांधी म्हणाले, महात्मा फुले जीवनदायी योजना, मुख्यमंत्री सहाय्यता निधी व इतर अनेक योजनांच्या माध्यमातून अनेक कुटुंबांना वैद्यकीय मदत मिळत आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी म्हणाले, देशपांडे दवाखान्याचा जिल्ह्यातील अनेक महिलांना लाभ झाला आहे. यापुढेही रुग्णांना अधिकाधिक चांगल्या वैद्यकीय सुविधा देण्यावर आमचा भर राहील. यावेळी नगरसेवक, अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी खासदार दिलीप गांधी, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, नगरसेवक बाबासाहेब वाकडे, सुवेंद्र गांधी, सुनीता भिंगारदिवे, अतिरिक्त आयुक्त विलास वालगुडे, उपायुक्त प्रदीप पठारे, उपविभागीय अधिकारी उज्ज्वला गाडेकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल बोरगे आदी उपस्थित होते.