जामखेड तालुक्यातील काळाभोर शेती पट्टा व ज्वारीचे कोठार म्हणून खर्डा परिसराची ओळख आहे. मेहनतीच्या जोरावर कमी पाण्यावरही चांगले उत्पादन घेणारे शेतकरी या भागात आहेत; मात्र निसर्गाच्या लहरीपणामुळे येथील शेतकऱ्यांना अनेकदा नुकसानाला तोंड द्यावे लागते. येथील शेती व्यवसाय व त्यावर अवलंबून असलेला या भागातील प्रमुख जोडधंदा दुग्ध व्यवसाय दुष्काळ पडताच चाऱ्याअभावी संकटात येतो. चारा छावण्यांचा आधार घेऊन हालअपेष्टा सोसत कसबसे पशुधन जगवावे लागते. यावर्षी मात्र चांगले पर्जन्यमान झाल्याने जामखेड तालुक्यातील खर्डा परिसरात मोठ्या प्रमाणात ज्वारीची पेरणी होऊन पीकही जोमात आले असून, या पिकातून ज्वारीचे उत्पादनाबरोबर जनावरांना वर्षभर आवश्यक असलेला वाळला चारा (कडबा वैरण) मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाल्याने या भागातील चाऱ्याचा प्रश्न मिटला आहे.
परिसरात गाई, बैल, म्हैस, शेळ्या,मेंढ्या अशी जवळपास वीस हजार पशुधन असून, सुमारे यातील ८९ टक्के जनावरे हे दुधाळ आहेत. मोठ्या प्रमाणात पशुपालन परिसरात केले जात असल्याने रब्बी ज्वारीचा पेरा अधिक करण्यात येतो. कारण यापासून ज्वारीच्या उत्पन्नाबरोबर जनावरांसाठी वर्षभर टिकणारा व पौष्टिक असा कडबा (वैरण) चारा मिळतो.
यंदा चांगला पाऊस परिसरात झाल्याने परिसरात ज्वारीबरोबर चाऱ्याचे भरघोस उत्पादन निघाल्याने परिसरातील वीस हजार पशुंची वर्षभराची चाऱ्याची भूक शमणार आहे. चाऱ्याचे डेपो लावून चारा साठवण्याची तजबिज करून शेतकऱ्याकडे वैरणीची गंज लावण्याचे काम जोमात सुरू झाले आहे.
दुग्ध व्यवसायसारखा प्रमुख परिसरात इतर कोणतेच रोजगाराचे साधन नसल्याने या भागात शेतीस प्रमुख जोडव्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जात आहे.
.........
१५ ते २० रुपयांना पेंढी
दुष्काळ काळात तीस रुपये देऊनही कडबा पेंडी मिळत नव्हती; मात्र यंदा ज्वारीचे भरघोस उत्पादन निघाल्याने यंदा पंधरा ते वीस रुपयांपर्यंत वैरण पेंडी मिळत असल्याने विशेष करून परिसरातील दुग्ध व्यवसाय शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
खर्डा