नेवासा : शहरात मागील महिन्यापासून सातत्याने होणारी रूग्ण वाढ ही चिंता वाढविणारी आहे. ही साखळी तोडण्यासाठी १५ ते २३ मे या कालावधीत जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला आहे. या काळात मेडिकल, दवाखाने वगळता सर्व व्यवहार बंद ठेवले जाणार आहेत.
मागील वर्षी कोरोनाची महामारी सुरू झाली असताना शहरातील अनेक नागरिकांनी व व्यापाऱ्यांनी प्राण गमावले आहेत. व्यापारी वर्गाचे यात खूप मोठे नुकसान झाले. शहराच्या व्यापारावर ही यामुळे मोठा परिणाम झाला. दररोज शहरात मोठ्या प्रमाणावर कोरोना बाधित आढळत आहेत. मागील महिन्यापासून ही रुग्णसंख्या सातत्याने वाढत आहे. तरीही शहरात फिरणाऱ्यांची संख्या कमी होत नाही. त्यामुळे सर्वांनी मिळून कोरोनाच्या विरोधात लढा द्यावा लागेल व त्यासाठी सर्वांच्या हितासाठी घरात राहून जनता कर्फ्यूला पाठिंबा देऊन साथ द्यावी, असे आवाहन नगरपंचायतीचे पदाधिकारी, सर्व नगरसेवकांनी केले आहे.
जनता कर्फ्यू दरम्यान शहरात विनाकारण बाहेर फिरताना आढळणाऱ्यांची रॅपिड ॲंटिजन टेस्ट केली जाणार आहे. ती व्यक्ती बाधित आढळल्यास त्याची रवानगी कोविड सेंटर येथे केली जाणार आहे. या काळात दुकाने उघडल्यास दुकानांवरही कडक कार्यवाही केली जाईल, असा इशारा नगराध्यक्ष योगिता पिंपळे, उपनगराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांनी दिला आहे.