घुलेवाडी हे अहमदनगर जिल्ह्यातील सर्वात मोठी लोकसंख्या असलेले गाव आहे. या गावात अनेक शैक्षणिक संस्था, उद्योग, व्यवसाय, सहकारी साखर कारखाना याच बरोबर तालुका ग्रामीण रुग्णालय आहे. या गावात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने उपाययोजना म्हणून १ मेपासून जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. गावात ग्रामसुरक्षा समितीची स्थापना करण्यात आली व दीडशे तरुण कार्यकर्ते सदस्य म्हणून निवडण्यात आले. या समितीच्या माध्यमातून गावात येणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले. काही ठिकाणी मुख्य रस्त्यांवर चेक पोस्ट उभे करण्यात आले आहे. विविध नगर, वस्त्या, सोसायटी, मळे यांची जबाबदारी या समिती सदस्यांना देण्यात येऊन अत्यावश्यक कामाशिवाय घरातून कोणी ग्रामस्थ बाहेर पडणार नाही याची खबरदारी घेण्यात येत आहे. त्यामुळे केवळ वैद्यकीय कारणांसाठी किंवा अत्यावश्यक सेवेसाठीच ग्रामस्थांनी बाहेर पडावे, असे बंधन घालण्यात आले आहे. जनता कर्फ्यूच्या काळात केवळ औषध दुकाने व वैद्यकीय सेवा आणि ठरावीक वेळेत दूध संस्था यांनाच परवानगी देण्यात आली. त्यामुळे गावात जनता कर्फ्यूचा परिणाम दिसून येतो आहे.
-----------------
स्वयंसेविका, अंगणवाडीसेविका तसेच प्राथमिक व माध्यमिक शाळेचे शिक्षक यांच्यासोबत ग्रामरक्षक समितीच्या सदस्यांनी घरोघरी जाऊन आरोग्य सर्वेक्षण पूर्ण केले. घुलेवाडी हद्दीतील आठ हजार ३४७ कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात आले. कोरोनाची लक्षणे आढळून आलेल्या तातडीने तपासणी करण्यात आली. कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आलेल्यांना पुढील उपचारासाठी वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात आली. त्यामुळे जनता कर्फ्यूचा जो मुख्य उद्देश होता, कोरोनाची साखळी तोडणे तो सफल होताना दिसतो आहे.
सीताराम राऊत, जिल्हा परिषद सदस्य, अहमदनगर
----------------------