केडगाव : नगर तालुक्यातील जेऊर येथे कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सोमवार ( दि. ३) पासून ते मंगळवार (दि. ११) पर्यंत ग्रामस्तरीय समितीच्या वतीने जनता कर्फ्यू पुकारण्यात आला आहे. जेऊर गावांमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून कहर केला आहे. आजतागायत जेऊरमध्ये ५०० च्यावर कोरोना रुग्ण आढळून आले आहेत, तर सद्यस्थितीत सक्रिय रुग्णांची संख्या शंभरवर आहे. दररोज कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे.
कोरोना विषाणूला आळा घालण्यासाठी ग्रामस्तरीय समितीने गावामध्ये जनता कर्फ्यू पुकारला आहे. जनता कर्फ्यू दरम्यान अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद राहणार आहेत. जनता कर्फ्यू दरम्यान नागरिकांनी सर्व आदेशाचे पालन करण्याचे आवाहन कोरोना ग्रामस्तरीय समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
जेऊर गावामध्ये विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या जास्त असून त्यांच्यावर कडक कारवाई होणे गरजेचे आहे. जेऊर कोरोना समितीने जनता कर्फ्यू पुकारण्याच्या घेतलेल्या निर्णयाचे ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.