राशीन : ग्रामसुरक्षेसाठी आता नागरिकांनीच पुढाकार घेण्याची गरज आहे. लोकसहभागातून कोणतेही मोठे काम सहज पार पडू शकते. खेडच्या नागरिकांनी सहकार्याची भूमिका ठेवत बॅरिकेड्सच्या माध्यमातून सामाजिक योगदान दिले आहे. आपला गाव आदर्श करण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे, असे मत पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी व्यक्त केले.
यादव यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत खेड येथे धनंजय मोरे व उद्योजक नीलेश निकम यांनी दिलेल्या प्रत्येकी ४ अशा एकूण ८ बॅरिकेड्सच्या अनावरणप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी माजी पं.स. सदस्य अण्णासाहेब मोरे, उपसरपंच सचिन मोरे, सोमनाथ वाघमारे, बाळासाहेब मोरे, लक्ष्मण कांबळे, पोपट मोरे, डॉ. विक्रम मोरे, उद्योजक नीलेश निकम, डॉ. वसंत साळुंके, धनंजय मोरे व ग्रामस्थ उपस्थित होते.
यादव म्हणाले, कर्जत पोलिसांनी राबविलेल्या अनेक प्रभावी उपक्रमांमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळत आहे. ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या एका फोन कॉलवर अडचणीत असलेल्या कुटुंबांना रात्री-अपरात्री शेकडो तरुणांची मदत होत आहे. या यंत्रणेत प्रत्येकाने आपल्या घरातील दोन सदस्यांची नोंदणी करून घ्यावी. गाव सीसीटीव्हीच्या नजरेत आणण्यासाठी आता सर्वांनी पुढाकार घेऊन आपले गाव सुरक्षित करा, असेही आवाहन त्यांनी केले.