पाथडी : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आता तरुणांना संधी द्या, असे म्हणत असले तरी स्वत: मात्र बाजूला व्हायला तयार नाहीत. लोकसभेत जनतेने त्यांना बाजूला केले़ आता विधानसभेतही जनता त्यांना बाजूला केल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांनी केली़ आगामी विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण हे योग्य वेळी जाहीर करु, असे मुंडे यांनी सांगितले. भगवानगडावर शनिवारी (दि़ ३१) सकाळी भगवानबाबांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी मुंडे आले होते. गडाच्या वतीने आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, सरचिटणीस सुरजितसिंग ठाकूर, गडाचे महंत नामदेव शास्त्री, माजी आमदार दगडू बडे, भीमराव धोंडे, चंद्रशेखर कदम आदी उपस्थित होते. मुंडे गडावर सुमारे तीन तास उशीरा आले तरी त्यांचे चाहते त्यांची वाट पहात उन्हात बसून होते. यावेळी मुंडे यांची पेढेतुला करण्यात आली. मुंडे म्हणाले, दोन्ही पवारांनी मला पाडण्यासाठी बीडमध्ये जंग जंग पछाडले़ परंंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. आता ते विधानसभेची धुरा खांद्यावर घेवून निघाले आहेत़ परंतु जनता त्यांना पायउतार केल्याशिवाय राहणार नाही. बीडमध्ये राष्ट्रवादीचे सहा आमदार असताना मी जिंकलो़ आमची पंकजा मुंडे या सर्वांना भारी भरली. पंकजा माझी वारसदार असल्याचे तीने सिद्ध केले आहे.२५ वर्षापासून आम्ही युती करुन निवडणुका लढवत आहोत. आजपर्यंत एकाही निवडणुकीत आम्ही मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर केला नाही़ त्यामुळे मुख्यमंत्रीपदाचा विषय आमच्या अजेंड्यावर नाही़ योग्य वेळ आल्यावर आम्ही ते जाहीर करु़ पंतप्रधान मोदी यांनी ग्रामविकासाचे महत्वाचे खाते देवून मोठी जबाबदारी दिली. खेड्याचा विकास करणारे खाते मिळाले, हे मी माझे भाग्य समजतो असल्यचे ते म्हणाले. (वार्ताहर)
पवारांना जनताच बाजूला करील
By admin | Published: May 31, 2014 11:46 PM