लोकमत न्यूज नेटवर्क
पुणतांबा : राहाता तालुक्यातील पुणतांबा गावाला पाणीपुरवठा करणारा साठवण तलाव आटला आहे. यामुळे पुणतांबेकरांवर पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. यामुळे गृहिणींचे आर्थिक बजेट कोलमडले आहे.
पाटाच्या पाण्याचे रोटेशन अनिश्चित काळासाठी लांबले आहे. यामुळे रस्तापूर येथील पूरक पाणीपुरवठा योजनेतील विहिरीवरून होणारा पाणीपुरवठा केला जात आहे, पण विजेच्या कमी दाबामुळे गावातील प्रभागांना चार दिवसांआड होणारा पाणीपुरवठा आठ ते दहा दिवसांनी फक्त अर्धा तास होत आहे. या वाढलेल्या दिवसामुळे यामुळे गावकऱ्यांवर २५० ते ३०० रुपये देऊन एक हजार लीटर पाणी विकत घ्यावे लागत आहे. एक तर कोरोनामुळे अनेकांच्या रोजीरोटीवर गदा आली आहे. त्यात दर सहा ते सात दिवसांनी पाण्यासाठी खर्च करावा लागत असल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत. याबाबत ग्रामपंचायतीकडे तक्रार करावी, तर ते वीज महावितरण कंपनीकडे बोट दाखवतात. यामुळे तक्रार कोणाकडे करावी, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
त्याचप्रमाणे, गावात मंडळ अधिकारी, तलाठी, वीज अभियंता, ग्रामसेवक यांचेही दुर्लक्ष होत असल्याची नागरिकांची तक्रार आहे.
....
पुणतांबा गावाला दहा दिवसांनी पाणीपुरवठा होत आहे, पण कोरोनामुळे शासकीय कर्मचारी कोणीच गावात निवासी नाही. यामुळे गावकऱ्यांच्या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहिले जात नाही.
- अनिल निकम, सामाजिक कार्यकेर्ते, पुणतांबा.
...
कोरोनामुळे रोजगार गेला. त्यात दर तीन, चार दिवसांत २५० रुपये खर्चून पाणी विकत घ्यावे लागत असल्याने, आर्थिक बजेट कोलमडले आहे.
-अमीन शेख, नागिरक.
....
पुणतांबा गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या साठवण तलावातील पाणी संपले आहे. पूरक पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीवरील विजेच्या कमी दाब व वारंवार खंडित होणारा वीजपुरवठ्याने पाणी वितरणात व्यत्यय येत आहे.
- सोमनाथ पटाईत, ग्रामविस्तार अधिकारी, पुणतांबा.
..