करंजी : राजकारणाच्या डावपेचाप्रमाणे कुस्त्यांच्या डावपेचाची माहिती असलेले आमदार शिवाजी कर्डिले यांनी चक्क लोहसर (ता.पाथर्डी ) येथील कुस्त्याच्या हंगाम्यात पंच म्हणून काम करुन आपण राजकारणातच नाही तर खेळातही तरबेज असल्याचे दाखवून देत परिसरातील नागरिकांना सुखद धक्का दिला.लोहसर (ता. पाथर्डी ) येथील भैरवनाथ यात्रेनिमित्त रविवारी कुस्त्यांचा हंगामा आयोजित केला होता. यात शेवटच्या मानाच्या कुस्तीचे पंच म्हणून आमदार शिवाजी कर्डिले यांनी पाहिले. यावेळी लोहसर ग्रामस्थांनी केलेल्या सत्कारास उत्तर देताना आमदार कर्डिले म्हणाले, मी विधानसभेच्या निवडणुकीला प्रथम येथील भैरवनाथाचे दर्शन घेवून प्रचारास सुरुवात केली आणि मला या मतदारसंघात दोन वेळा प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली. त्यामुळे मला भैरवनाथाची प्रचिती आलेली आहे. लवकरच या तीर्थक्षेत्राचा ‘क’ वगार्तून ‘ब’ वर्गात समावेश करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. राळेगणसिद्धी, हिवरेबाजार या गावाबरोबरच लोहसरचे नाव घेतले जात आहे. याचे श्रेय मात्र गावचे सरपंच अनिल गिते यांचे असल्याचेही त्यांनी सांगितले. लोहसर येथे झालेल्या हंगाम्यात जि.प. सदस्य अनिल कराळे, जि.प. सदस्य पुरुषोत्तम आठरे, पं.स. सदस्य एकनाथ आटकर, गटविकास अधिकारी डॉ. जगदीश पालवे, जेष्ठ नेते जगन्नाथ गिते आदिंच्या हस्ते मानाच्या कुस्त्या लावण्यात आल्या. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते. सरपंच अनिल गिते यांनी सूत्रसंचालन तर आभार जेष्ठ नेते जगन्नाथ गिते यांनी मानले.
लोहसरच्या कुस्ती आखाड्यात आमदार झाले पंच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2018 1:44 PM