Maharashtra Kesari 2025 Winner: पुण्याच्या पृथ्वीराज मोहोळला यंदाचा महाराष्ट्र केसरीचा किताब मिळाला आहे. सोलापुरचा कुस्तीपटू महेंद्र गायकवाड याला पराभूत करत पृथ्वीराज मोहोळ महाराष्ट्र केसरी ठरला आहे. मॅटवर घडलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर पुण्याच्या पृथ्वीराज मोहोळनं महाराष्ट्र केसरीची गदा जिंकली. दोन गुण मिळवत पृथ्वीराजने महेंद्र गायकवाड याला पराभूत केलं.
अहिल्यानगर येथे सुरू असलेल्या ६७ व्या महाराष्ट्र केसरीच्या अंतिम स्पर्धेत पृथ्वीराज मोहोळने महेंद्र गायकवाडचा पराभव केला. एका गुणाने महेंद्रचा पराभव करत पृथ्वीराज मोहोळने महाराष्ट्र केसरीचा खिताब पटकावला. या विजयानंतर पृथ्वीराज मोहोळच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला. त्यानंतर पृथ्वीराजने त्याच्या वडिलांना खांद्यावर उचलून घेत आपला आनंद व्यक्त केला.
६७व्या महाराष्ट्र केसरी किताब स्पर्धेची अंतिम लढत पृथ्वीराज मोहोळ आणि महेंद्र गायकवाड यांच्यामध्ये झाली. अंतिम स्पर्धेत पृथ्वीराज मोहोळला पहिला पॉईंट मिळाला. नंतर दुसरा पॉईंट महेंद्र गायकवाडने मिळवला आणि बरोबरी केली. त्यानंतर पृथ्वीराज मोहोळने पुन्हा एकदा एक पॉईंट घेतला आणि सामना जिंकला. सामन्याच्या दरम्यान काही प्रेक्षकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी लगेच हस्तक्षेप करून त्यांना बाजूला केलं. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पृथ्वीराजला महाराष्ट्र केसरी स्पर्धेची मानाची गदा देण्यात आली.
अंतिम स्पर्धेतील दोघेही स्पर्धक तुल्यबल असल्याने हा सामना अधिक रंगतदार बनला होता. गादी गटातून पृथ्वीराज मोहोळ आणि माती गटातून महेंद्र गायकवाड हा अंतिम सामन्यात पोहोचला होता. यानंतर महेंद्र गायकवाड आणि पृथ्वीराज मोहोळ यांच्यात अंतिम सामन्याचा थरार रंगला. चितपट न होता २-१ गुणांच्या फरकाने पृथ्वीराज मोहोळने ही कुस्ती जिंकत महाराष्ट्र केसरी किताब पटकावला.
कुस्तीला सुरवात झाल्यानंतरच महेंद्र गायकवाडची जर्सी फाटली आणि ती बदल्यासाठी त्याने थोडा वेळ घेतला. त्यानंतर लढत सुरु होताच पृथ्वीराजने एक गुण मिळवला. त्यानंतर वरचढ ठरत असलेल्या पृथ्वीराजने दुसरा गुण मिळवला. त्यानंतर महेंद्रनेही एक गुण मिळवला. मात्र पृथ्वीराजच्या दुसऱ्या गुणावर महेंद्रने नाराजी दाखवली आणि शेवटी महेंद्रने मैदान सोडले. त्यानंतर पृथ्वीराजला विजयी घोषित करण्यात आलं.