अहमदनगर : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर शहरात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनला तब्बल दोन महिने झाल्यानंतर आता व्यापाऱ्यांना अनलॉकचे वेध लागले असून, १ जूनपासून बाजारपेठ सुरू होण्याची अपेक्षा आणि प्रतीक्षा आहे.
नगर शहर व परिसरातील बाजारपेठा दोन महिन्यांपासून लॉकडाऊन आहे. १ जूनपासून बाजारपेठ अनलॉक करण्याची मागणी शहरातील ठोक व्यापारी, एम.जी. रोड व्यापारी असोसिएशन, वंदे मातरम युवा प्रतिष्ठान, अहमदनगर व्यापारी महासंघ, आडते बाबाजार मर्चंट असोसिएशन यासह विविध संघटनांची मागणी आहे. याबाबत वेळोवेळी निवेदने देण्यात आली. निवेदनात म्हटले आहे, की कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी राज्य सरकारच्या आदेशाप्रमाणे ‘ब्रेक द चेन’ सुरू होऊन दोन महिने उलटले. या व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून प्रशासनाला सहकार्य केले. त्यामुळे व्यापाऱ्यांची आर्थिक परिस्थिती ढासळली आहे. व्यापाऱ्यांना शासनाकडून कुठल्याही प्रकारची आर्थिक मदत मिळालेली नाही. मालमत्ता कर, वीजबिल, जीएसटी, विविध करांबाबत सवलत देण्याचा निर्णय झालेला नाही. बाजारपेठेत काम करणाऱ्या कामगारांच्या हाताला दोन महिन्यांपासून काम नाही. कोरोनाच्या पहिल्या लाटेत कामगारांना काहींनी ६० टक्के तर काहींनी निम्मा पगार दिला होता. यावेळी मात्र ते शक्य झाले नाही. त्यामुळे कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. दुकानातील नोकरांचा पगार, दुकान भाडे, स्वतःचा खर्च, औषध उपचार खर्च, व्यावसायिक कर्जाचे व्याज, मालाचे होणारे त्यात पावसाळ्यापूर्वीची करायची देखभाल दुरुस्तीची कामे प्रलंबित आहेत. पावसाळा तोंडावर आला आहे. पाऊस सुरू झाल्यास ही कामे करता येणार नाहीत. अनेक व्यापाऱ्यांनी माल घेऊन ठेवला. परंतु, दुकाने बंद असल्याने खरेदी केलेला माल पडून आहे. शहरातील रुग्णसंख्या कमी झाली आहे. त्यामुळे शहर व परिसरातील बाजारपेठा सुरू करण्याची परवानगी मिळावी. नियमांचे पालन करून व्यापारी दुकाने सुरू करतील, असे व्यापाऱ्यांचे म्हणने आहे.
.........
नगरला रेडझोनमधून वगळावे
नगर शहरातील रुग्ण संख्येत लक्षणीय घट झाली आहे. नगर जिल्ह्याचा समावेश रेडझोनमध्ये करण्यात आला आहे. परंतु, नगर शहरातील रुग्णसंख्या शंभरच्या आत आहे. त्यामुळे नगर शहराला रेडझोनमधून वगळून बाजारपेठा सुरू करण्यास प्रशासनाने परवानगी द्यावी, अशी मागणी व्यापाऱ्यांकडून केली जात आहे.
.....
५ एप्रिलपासून बाजारपेठ बंद
राज्य सरकारने लॉकडाऊन जाहीर केल्याने ५ एप्रिलपासून शहर व परिसरातील बाजारपेठा बंद आहेत. आडतेबाजार, कापडबाजार, किराणा दुकाने बंद असल्याने कामगारांसमोर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यात आता शहरातील रुग्ण संख्या घटल्याने १ जूनपासून व्यापार सुरू करण्याची परवानगी देण्याची मागणी पुढे येत आहे.
...
गेल्या दोन महिन्यांपासून बाजारपेठ बंद आहे. पहिली लाट ओसरल्याने व्यापारी माल खरेदी केली. पण, दुसरी लाट आणली. दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या झपाट्याने वाढली. त्यामुळे व्यापाऱ्यांची दुकाने बंद ठेवून प्रशासनाला सहकार्य केले. परंतु, आता रुग्णसंख्येत लक्षणीय घट झाली आहे. नियमांचे पालन करून व्यापारी व्यावसाय करतील. केवळ व्यापारी म्हणून याकडे पाहू नका. यावर अवलबून असणाऱ्या कामगारवर्गाचाही विचार व्हावा, अशी सर्व व्यापाऱ्यांची मागणी आहे.
- ईश्वर बोरा, संचालक, अहमदनगर व्यापारी महासंघ
......
नगर शहरातील रुग्णसंख्येत घट झाली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून बाजारपेठ बंद आहे. प्रशासनाने याबाबत निर्णय घेऊन बाजारपेठ सुरू करण्यास परवानगी द्यावी.
- संग्राम जगताप, आमदार