टाकळी ढोकेश्वर : पारनेर तालुक्यातील पिंपळगाव रोठा येथे शनिवारी (दि.२३) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास कुत्र्याच्या पिलाचा पाठलाग करीत असताना बिबट्या थेट एका घरात घुसला. कुत्र्याचे पिल्लू निसटले पण बिबट्या घरात अडकला. दरम्यान वनविभागाच्या खास पथकाने चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर घरातून बिबट्याला पिंज-यात जेरबंद केले. पिंपळगाव रोठा येथे दिलीप जगताप यांच्या घरात शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास कुत्र्याच्या पिलाचा पाठलाग करताना बिबट्या घरात घुसला. यावेळी जगताप यांच्या घरात त्यांचे कुटुंबीय घरातच होते. बिबट्याला पाहताच ते घाबरले. त्यांनी सर्वांनी धीर न सोडता सर्व जण दुस-या दरवाजातून बाहेर पडले. यानंतर बिबट्या ज्या दरवाज्यातून आला होता. तोही दरवाजा बंद केला. दोन्ही दरवाजे बंद करून घराला कड्या लावल्याने बिबट्या घरातच जेरबंद झाला. मोठ्या धाडसाने दिलीप जगताप यांनी आपल्या सर्व कुंटुबाला काही सेकंदात दुसºया दरवाजातून सुखरुप घराबाहेर काढल्याने नि:श्वास टाकला. या घटनेची माहिती गावातील ग्रामस्थांना कळाल्यानंतर सर्व तरुणांनी घराकडे धाव घेतली. काही नागरिकांनी तातडीने आमदार निलेश लंके यांना फोन केल्यानंतर काही तासात बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाचे कर्मचारी पिंजरा घेऊन घटनास्थळी दाखल झाले. यावेळी घराच्या परिसरात ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. जुन्नरच्या खास पथकाला पाचारणवनविभागाच्या कर्मचाºयांनी बिबट्याला पिंज-यात टाकण्यासाठी प्रयत्न सुरू केले. परंतु त्यांना मोठ्या अडचणी येऊ लागल्या. यानंतर कर्मचाºयांनी जुन्नर (जि.पुणे) येथील वनविभागाच्या खास पथकाला बोलविले. तब्बल चार तास उलटले तरी बिबट्या जेरबंद झाला नाही. शेवटी वनविभागाच्या पथकाने घराच्या खिडकीतून गनच्या साह्याने भूलीचे इंजेक्शन मारुन बिबट्याला पिंजºयात जेरबंद करण्यात यश मिळविले.
कुत्र्याच्या पाठलाग करताना बिबट्या घुसला घरात..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2019 5:24 PM