कर्जत : शासकी दराने दूध, उडीद खरेदीसह विविध मागण्यांसाठी बुधवारी माहिजळगाव येथे दोन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. शेतक-यांच्या मागण्या मान्य न झाल्यास २४ आॅक्टोबर रोजी कर्जत येथे दंडूके मोर्चा काढून शासकीय कार्यालयांना टाळे ठोकण्याचा इशारा दिला आहे.कर्जत तालुक्यातील भारनियमन बंद करावे, शेतक-यांचा उडीद विनाअट खरेदी करावा, शासकीय दराने दूध खरेदी करावी, अहमदनगर-सोलापूर राज्य मार्गाची दुरुस्ती करावी, माहिजळगाव परिसराला कुकडीचे पाणी नियमित मिळावे, या मागण्यासाठी कर्जत तालुका काँग्रेसचे अध्यक्ष किरण पाटील यांच्या नेतृत्वाखाली माहिजळगाव येथे चौफुल्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन दोन तास चालले. यावेळी मोठी वाहतूक कोंडी झाली होती. महामार्गाच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. संतप्त शेतक-यांनी केंद्र व राज्य सरकार यांच्या कारभारावर जोरदार टीका केली. तसेच पालकमंत्री राम शिंदे यांच्या बाबत नाराजी व्यक्त केली. भाजपचे सरकार अच्छे दिन आणेल, असा सर्वांना विश्वास होता. मात्र या सरकारने भ्रमनिरास केला. हे शेतकरी हिताचे नाही तर व्यापारी हिताचे सरकार आहे, कशी टीका करण्यात आली. यामुळे ऐन दिवाळीत शेतक-यांना त्यांच्या विविध प्रकारच्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागले आहे. या आंदोलनात माहिजळगाव व परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी किरण पाटील, युवक काँग्रेसचे कर्जत-जामखेडचे अध्यक्ष दादासाहेब सोनमाळी, काँग्रेस नेते बाळासाहेब साळुंके, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रविण घुले, कैलास शेवाळे, शेतकरी संघटनेचे संजय तोरडमल, भानुदास हाके यांची भाषणे झाली़ आंदोलनात सतिष पाटील, संतोष धुमाळ, किशोर कोपनर, सुभाष महारनवर, कांतिलाल देवगिरे, गोकुळ इरकर, विष्णू खेडकर, नवनाथ कदम यांच्यासह मोठ्या प्रमाणात शेतकरी आंदोलक उपस्थित होते.
पालकमंत्र्यांनी बदलला मार्ग
पालकमंत्री राम शिंदे हे आज सकाळी चौंडी येथे होते़ ते माहिजळगावमार्गे नगरला जाणार होते. मात्र या आंदोलनामुळे पालकमंत्र्यांनी मार्ग बदलला व ते जामखेडमार्गे नगरला गेले. पालकमंत्र्यांनी आंदोलकांना घाबरुन मार्ग बदलला, असे कर्जत तालुका काँग्रेसचे अध्यक्ष किरण पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.