संगमनेर : वाळूची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर कारवाईसाठी गेलेल्या महसूलच्या तलाठ्यास वाळू तस्करांनी शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली. ही घटना मंगळवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील मंगळापूर गावच्या शिवारात वसुधा डेअरीजवळ घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात बुधवारी दुपारी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दीपक वाळे, राजू वाळे (दोघेही रा.मंगळापूर,ता.संगमनेर) व ट्रॅक्टर मालक (नाव माहिती नाही) या तिघांविरोधात तलाठी पोमल दत्तात्रय तोरणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे. लॉकडाऊनचे नियम शिथील केल्यानंतर अवैध वाळू वाहतुकीला देखील सुरूवात झाली आहे. तालुक्यातील मंगळापूर शिवारात रात्री अवैधरित्या वाळूची वाहतूक होत असल्याची माहिती तलाठी तोरणे यांना समजली.
तोरणे हे याठिकाणी कारवाईसाठी गेले असता त्यांना एक लाल रंगाचा ट्रॉली जोडलेला ट्रॅक्टर (एम. एच. १७, के. १३४८) जाताना दिसला. त्यांती तो वसुधा डेअरीजवळ थांबविला असता या ट्रॉलीत सुमारे एक ब्रास वाळू भरलेली होती. अवैधरित्या वाळू वाहतूक सुरू असलेला ट्रॅक्टर, ट्रॉली पकडल्याने दीपक वाळे व राजू वाळे या दोघांनी तोरणे यांना दमबाजी, शिवीगाळ करीत धक्काबुक्की सुरू केली. तोरणे यांनी टॅक्टर व ट्रॉली ताब्यात घेत तो प्रांत कचेरीच्या आवारात आणून लावला आहे. शहर पोलीस ठाण्यात अवैधरित्या वाळू वाहतूक करणाºयांविरोधात तोरणे यांनी फिर्याद दिली आहे. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे करीत आहेत.