लोकमत न्यूज नेटवर्क
राहुरी : राहुरी तालुक्यात कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. अनेक रुग्णालयात उपचारासाठी जागा मिळत नाही. त्यामुळे बहुतेक रुग्ण हे घरीच उपचार घेत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे तहसीलदार फसियोद्दीन शेख यांनी गाव तेथे क्वारंटाइन सेंटर उभारण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच घरोघर जाऊन लोकांच्या तपासण्या करण्यासाठी पथकांची नियुक्ती करण्यात येणार आहे.
रविवारी (दि. २५) सायंकाळी प्रशिक्षणार्थी प्रांत अधिकारी दयानंद जगताप, तहसीलदार फसियोद्दीन शेख यांनी तालुका प्रशासनाची बैठक घेतली. या बैठकीस गट विकास अधिकारी गोविंद खामकर, मंडलाधिकारी दत्ता गोसावी, तालुका वैद्यकीय अधिकारी दीपाली गायकवाड यांच्यासह विविध विभागांतील मंडलाधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, पोलीसपाटील आदी सहभागी झाले होते. गावांमधील सौम्य लक्षणे असणारे व रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांना आता गावातीलच जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये क्वारंटाइन करण्यात येणार आहे. यामधे प्रामुख्याने सरपंच, पोलीसपाटील, तलाठी, ग्रामसेवक, ग्रामपंचायत शिपाई, कोतवाल, अंगणवाडी सेविका, आशा सेविका आदींच्या त्यासाठी नियुक्त्या करण्यात येणार आहे. पहिल्या लॉकडाऊनमध्ये ज्या पद्धतीने घरोघरी जाऊन लोकांच्या तपासण्या केल्या होत्या, त्याच पद्धतीने आता तपासण्या करण्यात येणार आहे. त्यामध्ये ऑक्सिजन लेवल किती आहे, इतर लक्षणे आहेत काय? घरी एखादा पॉझिटिव्ह रुग्ण तर नाही ना, याची तपासणी सदरचे पथक करणार आहे. या पथकास सर्व नागरिकांनी सहकार्य करावे व कोरोनाच्या लढाईत प्रत्येकाने सहयोग द्यावा, असे आवाहन तहसीलदार शेख यांनी केले आहे.
..................
तालुक्यात २०० पथकांची स्थापना
या पथकामध्ये आशा सेविका, अंगणवाडी सेविका तसेच शिक्षक यांचा समावेश राहणार असून, सदरच्या पथकास ऑक्सिमीटर, थर्मल स्कॅनर व इतर आनुषंगिक साहित्य संबंधित ग्रामपंचायतमार्फत पुरविण्यात येणार आहे. राहुरी तालुक्यात एकूण २०० आशासेविका असून, सुमारे ३५० अंगणवाडी सेविका व सुमारे ८०० प्राथमिक शिक्षक आहेत. त्यामुळे तालुक्यात २०० पथकांची स्थापना करण्यात येणार असून, प्रत्येक पथकामध्ये आशा, अंगणवाडीसेविका आणि शिक्षक यांचा समावेश असणार आहे. हे सर्वेक्षण २८ एप्रिलपासून दोन मे या पाच दिवसांत होणार असून एक पथक साधारणपणे हजार लोकांची तपासणी करणार आहे.
................
३ लाख ४६ हजार लोकांची तपासणी
राहुरी तालुक्यात सुमारे ५२ हजार २०० कुटुंबे ग्रामीण भागात राहत असून, त्यांची एकूण लोकसंख्या सुमारे २ लाख ७५ हजार आहे, तर नगरपालिका क्षेत्रामध्ये राहणाऱ्या कुटुंबांची संख्या १५ हजार असून, लोकसंख्या साधारणपणे ७१ जार इतकी आहे. पुढील पाच दिवसांमध्ये सुमारे ३ लाख ४६ हजार लोकसंख्येची या सर्वेक्षणाच्या माध्यमातून तपासणी होणार आहे. या तपासणी दरम्यान ज्या लोकांना लक्षणे दिसतील त्यांची त्वरित कोरोना टेस्ट करून त्यांच्यावर उपचार करण्यात येणार आहेत.