पहिली ते आठवी : गतवर्षीच्या पुस्तकांचा करणार पुनर्वापर
अहमदनगर : सर्व शिक्षा अभियानांतर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना दरवर्षी मोफत पुस्तके दिली जातात. परंतु यंदा जुन्या पुस्तकांचा पुनर्वापर करण्यासाठी गतवर्षीची पुस्तके परत करण्याचे आवाहन पालकांना करण्यात आले असून त्यानुषंगाने जिल्ह्यातील पहिली ते आठवीचे एकूण सव्वासहा लाख विद्यार्थी पुस्तके परत करणार आहेत.
दरवर्षी शासनाकडून पहिली ते आठवीपर्यंतच्या मुलांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून करण्यात येते. मागील वर्षी पहिली ते आठवीपर्यंतच्या एकूण ६ लाख २१ हजार विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. पण मागील वर्ष कोरोनामध्येच गेले. विद्यार्थी घरीच असल्याने त्यांच्याकडून पुस्तकांची हाताळणी इतर वर्षीच्या तुलनेने कमी झाली असावी. यातून पुस्तके सुस्थितीत असल्याचा अंदाज व्यक्त करत तसेच यावर्षी कोरोनामुळे पुन्हा पुस्तके वाटप करण्याच्या अनुषंगाने शासनापुढे आर्थिक अडचण असल्याने मागील वर्षीची सुस्थितीत असलेली पुस्तके विद्यार्थ्यांकडून जमा करून ती या वर्षी इतर विद्यार्थ्यांना द्या, असे शासनाने शिक्षण विभागाला कळवले आहे. त्या अनुषंगाने शिक्षण विभागाने शिक्षकांना सूचना दिलेल्या आहेत. शिक्षक आपापल्या परीने पालकांशी संपर्क करून पाठ्यपुस्तके जमा करून घेण्याचे काम करत आहेत, मात्र कोरोनाची स्थिती असल्याने त्याचा वेग कमी आहे.
------------
कोणत्या वर्गात किती विद्यार्थी
वर्ग. विद्यार्थी संख्या
पहिली ६८७१६
दुसरी ७४८९६
तिसरी ७८४५१
चौथी ८०४४९
पाचवी ७९६०५
सहावी ७९७१६
सातवी ७९७७८
आठवी ८००६८
नववी ८१२००
अकरावी ६३८२२
-----------------------------
एकूण. ६२१६७९
-------------------
यावर्षी मागणी किती ?
सुस्थितीत असलेली पुस्तके जमा केल्यानंतर यावर्षी किती पुस्तके पुन्हा वाटपासाठी लागतील याचा हिशेब करून शासन काही प्रमाणात नवीन पुस्तके विद्यार्थ्यांना देऊ शकते.
----------
कोरोनामुळे पुस्तके जमा करण्यात अडचणी
ग्रामीण भागात कोरोना रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन पुस्तके जमा करण्याचे मोठे आव्हान शिक्षकांसमोर आहे. काही गावांमध्ये जनता कर्फ्यूही आहे. त्यामुळे पुस्तके जमा करण्यात शिक्षकांसमोर अडचणी येत आहेत.
------------
सर्व शिक्षा अभियानांतर्गत दरवर्षी पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शासनाकडून नवीन पुस्तके दिली जातात. परंतु यंदा पाठ्यपुस्तके जमा करण्याचे आवाहन पालकांना केलेले आहे. पुस्तके जमा करून ती खालच्या वर्गांना देणार आहोत. त्यातून पुस्तकाचा पुनर्वापर होईल.
- गुलाब सय्यद, शिक्षणाधिकारी, प्राथमिक
--------------
पुस्तके जमा करण्याबद्दल शिक्षकांकडून समजले आहे. परंतु कोरोना संसर्गामुळे अद्याप जमा केले नाही. वातावरण निवळताच पुस्तके शाळेत जमा केले जातील.
- संजय सोनवणे, पालक
जि.प.प्रा.शाळा निबेदेवकर वस्ती, ता. राहाता
---------------
पुस्तकाचा पुनर्वापर करणे चांगली गोष्ट आहे. आमच्या विद्यार्थ्यांचे पुस्तके इतर विद्यार्थ्यांच्या कामी येत असतील तर चांगली बाब आहे. शिक्षकांचा आवाहनानुसार लवकरच पुस्तके परत केली जातील.
- पाराजी खरात, पालक
जि. प शाळा वरशिंदे, ता. राहुरी
--------
नेट फोटो- डमी
बुक गाईड हेरो बुक्स
०७ टेक्सबुक रिटर्न डमी
बुक गाईड हिरो बुक्स