अहमदनगर : नगरच्या बहुचर्चित उड्डाणपुलाचा प्रश्न अंतिम टप्प्यात आला आहे. लष्कराने काम सुरु करण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र दिले असून संरक्षण विभागाच्या सचिवांची स्वाक्षरी झाल्यानंतर या पुलाचा मार्ग मोकळा होईल, असे खासदार डॉ. सुजय विखे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. विखे यांनी ‘लोकमत’ कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी संवाद साधताना ते म्हणाले, लॉकडाऊनमुळे विकासाचे अनेक प्रकल्पही अडकून पडले आहेत. मात्र, जागतिक संकट असल्याने यास काहीही पर्याय नव्हता. आता लॉकडाऊन हळूहळू कमी होऊन जनजीवन पूर्वपदावर येईल अशी आशा आहे. नगर शहराच्या विकासासाठी उड्डाणपुलाची नितांत आवश्यकता आहे. त्याची निविदाही झालेली आहे. ठेकेदारही नियुक्त केला गेला आहे. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे काम अडले आहे. कामास विलंब झाल्याने ठेकेदाराने दिलेल्या बँक गॅरंटीची मुदत संपली होती. ही मुदत वाढविण्याची मागणी आपण केली होती. नॅशनल हायवे अॅथॉरिटीने ही मुदत वाढविण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे पुन्हा निविदा मागविण्याची गरज भासणार नाही. या पुलासाठी संरक्षण विभागाने ना हरकत दिली असून संरक्षण सचिवांची स्वाक्षरी झाल्यानंतर हा प्रश्न निकाली निघेल. लॉकडाऊन संपताच यासाठी दिल्लीत जाऊन पाठपुरावा करणार आहे. नगर महापालिकेच्या बाळासाहेब देशपांडे रुग्णालयाची इमारत जुनी झाली आहे. याच इमारतीच्या मागील बाजूला दोन टप्प्यात नवीन इमारत बांधण्याचा महापालिकेचा प्रस्ताव आहे. महापालिकेने यासाठी जिल्हा नियोजनकडे निधीची मागणी करावी अशी सूचना आपण केली आहे. प्रोफेसर चौकात जी महापालिकेची इमारत आहे. तेथे जनतेसाठी एमआरआय व लॅबची सुविधा देण्यासाठी पालिकेला जिल्हा नियोजनमधून निधी मंजूर आहे. हे काम मार्गी लागल्यास शहरातील सामान्य जनतेसाठी ती चांगली सुविधा निर्माण होईल. यादृष्टीनेही आपण प्रशासनाच्या संपर्कात आहोत. आपण आरोग्य व्यवस्थेवर अधिक लक्ष केंद्रित करायला हवे हे कोरोना संकटातून निदर्शनास आले आहेत. त्यामुळे नगर शहरातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी आपण महापौर व महापालिकेच्या संपर्कात आहोत. जिल्हा रुग्णालय हे कोविड सेंटर जाहीर झाल्याने तेथे इतर रुग्णांची तपासणी करण्याबाबत मर्यादा होत्या. त्यामुळे विळद घाटात विखे फाउंडेशनच्या रुग्णालयात अशा साडेतीनशे प्रसूती करण्यात आल्या, असे त्यांनी सांगितले. स्पर्धा परीक्षा केंद्र चालविण्याची तयारी महापालिकेचे सावेडीत ‘प्रमोद महाजन स्पर्धा परीक्षा केंद्र’ आहे. मात्र हे केंद्र सध्या बंद आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणा-या मुलांची गैरसोय होत आहे. महापालिकेने परवानगी दिल्यास जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून हे केंद्र अत्यंत सक्षमपणे चालविले जाईल. त्यासाठी आपण महापालिकेशी पत्रव्यवहार करणार आहोत, असे ते म्हणाले. ७५ हजार कुटुंबांना किराणा व अन्नछत्रलॉकडाऊनच्या काळात आपण मतदारसंघात प्रत्येक जिल्हा परिषद गटात संपर्क करुन जनतेच्या अडचणी जाणून घेतल्या. जिल्ह्यात ७५ हजार गरजू कुटूंबांना जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून किराण्याचे वाटप केले. लोणी येथे आठ दिवस दररोज ४० हजार नागरिकांच्या जेवणाची सोय करण्यासाठी अन्नछत्र चालविले.
नगरच्या उड्डाणपुलाचा प्रश्न अंतिम टप्प्यात; खासदार सुजय विखे : स्पर्धा परीक्षा केंद्राचाही प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 11:53 AM