अहमदनगर : येथील सह जिल्हा निबंधक कार्यालयातील संगणकात वारंवार बिघाड होत असल्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असून, याबाबत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी केली आहे.
महापौर वाकळे यांनी सह जिल्हा निबंधक कार्यालयास दिलेल्या पत्रात म्हटले आहे, की शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील पराग बिल्डिंगमध्ये मालमत्ता खरेदी विक्रीचे व्यवहार सुरू असतात. सध्या कोरोना विषाणूमुळे गर्दी टाळणे गरजेचे आहे. असे असताना कार्यालयातील सर्व्हर वारंवार बंद पडते. सर्व्हर डाऊन होत असल्याने नागिरकांना मालमत्ताची खरेदी-विक्री करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असून, कार्यालयात गर्दी होते. ही गर्दी टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी वाकळे यांनी सहजिल्हा उपनिबंधकांकडे केली आहे.