चांदा : नेवासा तालुक्यातील चांदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात अगदी पहाटेपासूनच लसीकरणासाठी ज्येष्ठ नागरिकांच्या रांगा लागत आहेत. येथे होणारी गर्दी टाळण्यासाठी आरोग्य विभागाने नियोजन करण्याची मागणी होत आहे.
दोन ते तीन दिवसांनंतर कोरोना प्रतिबंधक लसीचे २०० डोस उपलब्ध होतात. त्यामधील सत्तर टक्के दुसऱ्यांदा घेणाऱ्यांना डोस देण्यासाठी प्राधान्य दिले जाते, तसेच अनेक जण लस घेण्यासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे येथे ज्येष्ठ नागरिक पहाटेपासूनच रांगा लावतात. गर्दी झाल्याने येथे फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडतो. याकडे मात्र आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत.
पहाटेपासूनच लोक रांगेत उभे राहतात. सकाळी दहा वाजता लसीकरण सुरू होते. त्यानंतरही भर उन्हात नागरिक रांगेत असतात. तेथे पिण्यासाठी पाणी नाही. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांचे हाल होत आहेत.