--------------------------
आजी-माजी सैनिकांची बैठक
अहमदनगर : आजी, माजी सैनिकांचे विविध प्रश्न, अडचणी सोडविण्यासाठी तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली तालुका पातळीवरील समितीची बैठक गुरुवार, दिनांक १८ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता तहसील कार्यालय, नेवासा येथे, तर तहसील कार्यालय श्रीरामपूर येथे दुपारी २ वाजता आयोजित करण्यात आली आहे.
ज्या आजी, माजी सैनिकांचे जमिनीबाबत, अतिक्रमणाबाबत, निवृत्तीवेतनाबाबत, कुटुंबीयांवरील अन्यायाबाबत काही प्रश्न, अडचणी असतील अशा आजी, माजी सैनिकांनी वरीलप्रमाणे आपापल्या तालुक्यातील समितीच्या बैठकीस उपस्थित राहावे. आपल्या अडीअडचणीबाबत लेखी स्वरूपात दोन प्रतीत अर्ज बैठकीदरम्यान सादर करावेत, असे आवाहन विजय बाबूराव वाघचौरे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, अहमदनगर यांनी केले आहे.
-------------
कौशल्यविकास विभागाच्या वतीने नोंदणी अभियान
अहमदनगर : जिल्हा कौशल्यविकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अहमदनगर यांच्यातर्फे जिल्ह्यातील १८ ते ४५ वयोगटातील युवक-युवती, दिव्यांग, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला उमेदवारांसाठी प्रधानमंत्री कौशल्यविकास योजनांतर्गत मोफत कौशल्य प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे. येत्या तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये प्रशिक्षण कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्याचे नियोजन आहे. जिल्हा कौशल्यविकास, रोजगार व उद्योजकता मर्गदर्शन केंद्र आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अहमदनगर यांनी दिनांक ४ फेब्रुवारी व ५ फेब्रुवारी या दोन दिवसांच्या कालावधीमध्ये संयुक्तिक उमेदवार नोंदणी अभियान राबविण्याचे निश्चित केले आहे. यास्तव शासकीय औद्योगिक प्रशिक्षण अहमदनगर येथे वरील दोन दिवशी प्रशिक्षण घेण्यास जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांना मार्गदर्शन व समुपदेशन करण्यासाठी सभागृह उपलब्ध करून दिलेले आहे, तसेच नोंदणी फॉर्म उपलब्ध करून दिलेला आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी संपर्क साधून नोंदणी फॉर्म भरून द्यावा व मोफत प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन दोन्हीही कार्यालयांच्या वतीने करण्यात येत आहे.