राहुरी : तालुक्यातील देवळाली प्रवरा नगरपालिकेत बुधवारी मासिक सर्वसाधारण सभेत नगराध्यक्ष सत्यजित कदम व मुख्याधिकारी अविनाश गांगोडे यांच्यात शाब्दिक खडाजंगी होऊन राडा झाल्याने पालिका प्रशासनामध्ये मोठी खळबळ उडाली.दुपारी एक वाजे दरम्यान पालिकेतील नगराध्यक्षांच्या दालनात हा प्रकार घडला. दोघांमध्ये शाब्दिक चकमक होऊन मोठी खडाजंगी झाली. नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी मुख्याधिकारी अविनाश गांगोडे यांना शिवीगाळ करीत मारण्यास खुर्ची उचलल्याने तणाव निर्माण झाला होता. मात्र यावेळी नगरसेवक संजय बर्डे, आदिनाथ कराळे, सचिन ढुस, प्रकाश संसारे, अण्णा चोथे व कर्मचाºयांनी मध्यस्थी केल्याने भांडणे सोडविण्यात आली. या घटनेचा विरोधी नगरसेवकांनी निषेध करुन अशा घटना पालिकेत वारंवार होत असून नगराध्यक्ष कदम मनमानी कारभार करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
- मागासवर्गीय कर्मचाºयांना सहाव्या वेतन आयोगाचा फरक देण्याबाबत चर्चा करण्यासाठी नगराध्यक्षांनी बुधवारी दुपारी मला त्यांच्या दालनात बोलावून घेतले. चर्चा करीत असताना मला अश्लिल भाषेत शिवीगाळ करून दालनातील खुर्ची उचलून मला जीवे मारण्याची धमकी दिली. नगराध्यक्षांच्या या वर्तनाबाबत व घटनेबाबत जिल्हाधिकाºयांची भेट घेऊन याबाबत गुन्हा दाखल करणार आहे.
- - अविनाश गांगोडे, मुख्याधिकारी, देवळाली प्रवरा नगरपालिका.
- मी कोणत्याही प्रकारची अश्लिल भाषा वापरली नाही. मी कोणत्याही प्रकारची शिवीगाळ केलेली नाही. मुख्याधिकारी माझ्यावर खोटे आरोप करीत आहेत. आम्ही लोकांची कामे करीत आहोत. लोकांच्या कामांना विलंब झाल्यास नाराजी वाढते.
- - सत्यजित कदम, नगराध्यक्ष, देवळाली प्रवरा.