संगमनेर/घारगाव/आश्वी : तालुक्यातील मुळा नदीपात्रातील वाळूला पुणे व ठाणे जिल्ह्यात तर प्रवरा नदीपात्रातील वाळूला संगमनेरसह परिसरात मोठी मागणी आहे. राज्य व राष्टÑीय महामार्गावरून होणाऱ्या वाळूच्या अवैध वाहतुकीकडे ‘अर्थपूर्ण संबंधातून’ दुर्लक्ष होत असल्याचे दिसते.तालुक्यातील प्रवरा, मुळा, आढळा, म्हाळूंगी आणि कच नदीपात्रातून दिवस-रात्र वाळूचा डंपरद्वारे अवैध उपसा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. वाळू वाहतुकीसाठी छोटी-मोठी वाहने, ट्रॅक्टर, बैलगाडी तसेच गाढवांचा उपयोग केला जातो. शहरालगत गंगामाई घाट परिसराबरोबरच कासारा-दुमाला, संगमनेर खुर्द, गुंजाळवाडी, वाघापूर, रायते, जोर्वे, पिंपरणे, राजापूर आदी गावांबरोबरच प्रवरा नदी वरील जुना, अकोले बाह्यवळण मार्गावरील नव्या पुलाजवळून, आश्वी परिसरातील प्रतापपूर, दाढ, उंबरी बाळापूर, ओझर आदी गावांतील नदीपात्रातील वाळूला संगमनेर तालुक्यात मोठी मागणी आहे. यावर उपाय म्हणून महसूल प्र्रशासनाने नदी पात्राकडे जाणाºया रस्त्यांवर चर खोदून वाळूची तस्करी रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही ठिकाणी वाळू तस्करांनी त्यावर पर्याय शोधत नदीपात्रालगत असलेल्या शेतातून मार्ग काढत उपसा करण्यासाठी वाट शोधली आहे. अवैध वाळू उपश्याला विरोध करणाºया नागरिकांना दमबाजी व मारहाणीचे प्रकारही तालुक्यात या पुर्वी घडले आहेत.पठार भागातील मुळा पात्रातून साकूर, खैरदरा, येठेवाडी, शेळकेवाडी, अकलापूर, घारगाव, तांगडी, कोठे आदी गावांतून दिवस-रात्र वाळू उपसा सुरू आहे. या वाळूला चांगला भाव मिळत असल्याने तिला संगमनेर तालुक्याबरोबरच पुणे व ठाणे जिल्ह्यातही मोठी मागणी आहे. साकूर, नांदूर खंदरमाळ, १९ मैल, बोटा, आळेफाटा, मंचर, खेड, चाकण पुणे या पुणे-नाशिक महामार्गावरून व अकलापूर, शेळकेवाडी, बोटा, आळेफाटा तर साकूर-जांबुतच्या केटीवेअर वरून पारनेर तालुक्यातून आळेफाटा मार्गे पुणे व ठाणे जिल्ह्यात वाळूची अवैध वाहतूक करणारी वाहने नेली जातात.
‘मुळा’ची वाळू पुणे, ठाण्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2019 1:01 PM