शिर्डी : राज्यातील जनतेला दिलासा देण्यापेक्षा अडचणी वाढविण्याचाच सरकारचा प्रयत्न दिसतो. कोणत्याही आश्वासनाची पूर्तता नाही. तीन तिघाडी आणि काम बिघाडी, अशी सरकारची अवस्था झाली आहे. मागील सरकारच्या योजना बंद करण्यावर सरकारचा भर आहे. शेतक-यांपेक्षा सरकारला नाईट लाईफचीच चिंता अधिक असल्याची खोचक टीका माजीमंत्री, आमदार राधाकृष्ण विखे यांनी केली.लोणी येथे सोमवारी माजीमंत्री विखे पत्रकारांशी बोलत होते. सरकार नविन असल्याने त्यांना निर्णय घेण्यासाठी आमच्या शुभेच्छा कायम आहेत. पण मूळ विषयाला बगल देण्याचे काम सरकारने थांबविले पाहिजे. अतिवृष्टीचे २५ हजार रुपये शेतक-यांना देण्याचे आश्वासन सरकारने दिले होते त्याचे काय झाले? सातबारा कोरा करण्याचा शब्दही हे सरकार विसरले आहे. केलेल्या घोषणांची अंमलबजावणी होत नसल्यानेच राज्यात पुन्हा शेतक-यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. घेतलेल्या निर्णयाच्या माध्यमातून सरकारने लोकांना दिलासा देण्याची आवश्यकता आहे. पण या सरकारकडून जनतेची अडवणूकच सुरू आहे. मुख्यमंत्र्याचा रिमोट कोण चालवतय यापेक्षा राज्याचा विकास महत्वाचा असल्याचे विखे यांनी स्पष्ट केले.पाणी प्रश्नाकडे सरकारने गांभीर्याने पहावेमाजी मंत्री पंकजा मुंडे यांनी मराठवाड्यातील पाणी प्रश्नावर केलेल्या आंदोलनाबाबत विखे म्हणाले, मागील सरकारच्या योजना बंद करून या सरकारला पुढे जाता येणार नाही. गोदावरीचे खोरे हे तुटीचे खोरे म्हणून ओळखले जाते. या भागातील पाणी प्रश्नासाठी कायमच संघर्ष झाला. स्व.बाळासाहेब विखे पाटील यांनी याबाबत सातत्याने भूमिका मांडली, पण विखे पाटलांना पाणी प्रश्नाचे श्रेय मिळेल म्हणून जे विरोध करत होते तेच आता या प्रश्नावर एका सुरात बोलू लागले आहेत. गोदावरी खो-यातील पाण्याची तूट भरून काढली तर नगर, नासिकसह मराठवाड्याचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सुटेल. पाणी प्रश्नावरून प्रादेशिक वाद निर्माण करण्यापेक्षा सरकारने या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहून मागील सरकारने मराठवाडा वॉटर ग्रीड आणि पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी गोदावरीच्या खो-यात वळविण्याच्या संदर्भात घेतलेल्या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करावी, अशी मागणी त्यांनी केली.
शेतक-यांपेक्षा सरकारला नाईट लाईफचीच चिंता अधिक- राधाकृष्ण विखे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2020 2:08 PM